मॅनचेस्टर : २०१९ वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल मंगळवार ९ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिली सेमी फायनल रंगेल. आतापर्यंत न्यूझीलंडने वर्ल्ड कपच्या ७ सेमी फायनल खेळल्या, पण यातल्या ६ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.
१९७५ सालच्या पहिल्याच वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी किवींची धुळधाण उडवली. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा १५८ रनवर ऑल आऊट झाला. वेस्ट इंडिजने हे आव्हान ४०.१ ओव्हरमध्येच ५ विकेट गमावून पूर्ण केलं. त्यावेळी वनडे क्रिकेट ६० ओव्हरचं होतं. या मॅचमध्ये न्यूझीलंडकडून हाऊअर्थने अर्धशतक केलं, तर जुलियनने २७ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर रॉबर्ट्सला २ आणि मार्शलला ३ विकेट मिळाल्या. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना कालीचरणने सर्वाधिक ७२ रन केले आणि गॉर्डन ग्रिनीजने अर्धशतकी खेळी केली.
१९७९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सेमी फायनल झाली. मॅनचेस्टरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये २२२ रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा ९ रननी पराभव झाला. इंग्लंडकडून ब्रेयरलीने ५३ रन आणि ग्रॅहम गूचने ७१ रन केले, तर रॅन्डलने ४२ रनची खेळी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना जॉन राईट यांनी ६९ रन करुन न्यूझीलंडला चांगली सुरुवात करुन दिली. पण जॉन राईट यांना कोणीच साथ दिली नाही. टर्नर यांनी ३० रन केले. केर्न्स आणि ली यांनी शेवटी फटकेबाजी करुनही न्यूझीलंडला हे आव्हान गाठता आलं नाही.
१९९२ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंजमाम उल हकने न्यूझीलंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. न्यूझीलंडने केलेल्या २६२ रनचा पाठलाग पाकिस्तानने ४९ ओव्हरमध्ये पूर्ण केला. इंजमाम उल हकने या मॅचमध्ये ३७ बॉलमध्ये ६२ रनची आक्रमक खेळी केली. त्याआधी जावेद मियादादनी ५७ रन आणि इम्रान खान- रमीझ राजा यांनी प्रत्येकी ४४ रन केले. न्यूझीलंडकडून मार्टीन क्रो यांनी ९१ रन आणि रुदरफोर्ड यांनी ५० रन केले.
१९९९ वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलचा मुकाबला झाला होता. पहिले बॅटिंग करुन न्यूझीलंडने २४१ रन केले. केर्न्स, फ्लेमिंग यांनी महत्त्वपूर्ण ४० रन केले. पण शोएब अख्तरने न्यूझीलंडला धक्के दिले. शोएबने या मॅचमध्ये ३ विकेट घेतल्या, तर वसीम अक्रम आणि वकार युनूसला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. पाकिस्तानचा या मॅचमध्ये ९ विकेटने विजय झाला. सईद अन्वरने नाबाद ११३ रन केले आणि वस्तीने ८४ रनची खेळी केली.
२००७ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने न्यूझीलंडला मात दिली. पहिले बॅटिंग करणाऱ्या श्रीलंकेने ५० ओव्हरमध्ये २८९/५ एवढा स्कोअर केला. महेला जयवर्धनेने नाबाद ११५ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला वारंवार धक्के लागले आणि त्यांचा २०१ रनवर ऑल आऊट झाला. ओपनर पीटर फल्टनने सर्वाधिक ४६ रन केले. मुरलीधरनने ३१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर त्याआधी लसिथ मलिंगाने न्यूझीलंडचा कर्णधार स्टिफन फ्लेमंगची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
२०११ वर्ल्ड कपमध्येही श्रीलंकेने पुन्हा एकदा न्यूझीलंडला धूळ चारली. स्कॉट स्टायरिसच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडने २१७ रनपर्यंत मजल मारली. दिलशान आणि संगकाराच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेचा ५ विकेटने विजय झाला. मलिंगा, मुरलीधरन आणि अजंता मेंडिसने न्यूझीलंडला धक्के दिले.
याआधीच्या ६ सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या न्यूझीलंडचा २०१५ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये विजय झाला. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला मात दिली. पहिले बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या मॅचमध्ये ४३ ओव्हरमध्ये २८१/५ एवढा स्कोअर केला. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे न्यूझीलंडला विजयासाठी ४३ ओव्हरमध्ये २९८ रनचं आव्हान मिळालं. अत्यंत अटीतटीच्या या मॅचमध्ये न्यूझीलंडचा १ बॉल राखून विजय झाला. ब्रॅण्डन मॅक्कलम, आणि कोरे अंडरसनने अर्धशतकी खेळी केली. तर ग्रॅण्ट एलियटने सर्वाधिक नाबाद ८४ रन करुन न्यूझीलंडला जिंकवून दिलं.