नॉटिंगहम : वर्ल्ड कपमधला भारत आणि न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही टीमना १-१ पॉईंट्स देण्यात आला. नॉटिंगहममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मॅचच्या दिवशीही पावसाने असाच तडाखा दिला. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे हा सामना पाण्यात गेला.
पावसामुळे सामना रद्द होणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, पण मागच्या ४८ तासांपासून बरसणाऱ्या पावासामुळे गोष्टी आणखी कठीण झाल्या, असं अंपायर म्हणाले.
'खेळ न झाल्यामुळे आम्ही निराश आहोत, पण खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा परिस्थितीमध्ये न खेळणंच योग्य आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही टीमच्या खेळाडूंना दुखापत नको आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे चिंता नाही. लागोपाठ २ मॅचमध्ये आमचा विजय झाल्यामुळे आमच्यात आत्मविश्वास आहे,' असं विराट म्हणाला. टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध १६ जूनला खेळवण्यात येणार आहे.
या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही बॉल न टाकता ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना सुरु झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे हा सामनाही रद्द करण्यात आला. याआधी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातला सामना एकही बॉल न टाकता पावसामुळे रद्द करण्यात आला होता. एकाच वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे एवढे सामने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी खेळवण्यात आलेल्या ११ वर्ल्ड कपमध्ये फक्त २ सामने एकही बॉल न टाकता रद्द झाले होते. १९७९ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका आणि २०१५ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश हे दोन सामने पावसामुळे रद्द झाले.
यंदाच्या वर्ल्ड कपमधले अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यामुळे आयसीसीला टीकेला सामोरं जावं लागत आहे. तसंच वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीत राखीव दिवस का नाही? असा प्रश्नही क्रिकेट चाहते आयसीसीला विचारत आहेत. आयसीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला तर स्पर्धेचा कालावधी खूप जास्त वाढेल, तसंच यासाठी लागणारी यंत्रणा आणि माणसं उपलब्ध होणंही अशक्य आहे, असं आयसीसीने सांगितलं.