ढाका : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी सगळ्या १० देशांनी त्यांच्या १५ सदस्यीय टीमची घोषणा केलेली आहे. तसंच सगळ्या देशांनी वर्ल्ड कपसाठीच्या त्यांच्या जर्सीही लॉन्च केल्या आहेत. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मात्र मोठ्या वादानंतर वर्ल्ड कपसाठीची जर्सी बदलावी लागली आहे.
बांगलादेश क्रिकेट टीमच्या जर्सीवर दोन रंग असतात. या जर्सीचा बहुतेक भाग हा हिरवा असतो, तर काही ठिकाणी लाल रंगाचा वापर केलेला असतो. पण वर्ल्ड कपसाठी जी जर्सी लॉन्च करण्यात आली त्यावर फक्त हिरवा रंगच होता. पहिल्यांदा बघितल्यावर बांगलादेशची ही जर्सी पाकिस्तान क्रिकेट टीमच्या जर्सीसारखीच दिसत होती. यानंतर बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांनी या जर्सीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे जर्सी बदलण्याची मागणी केली.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाची ही विनंती आयसीसीने स्वीकारली आणि मग नवी जर्सी लॉन्च करण्यात आली. या नव्या जर्सीवर हिरव्या रंगाबरोबरच लाल रंगाचाही समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन या सगळ्या वादावर म्हणाले, 'जर्सी लॉन्च झाल्यानंतर बोर्ड डायरेक्टर्सची बैठक झाली. त्यावेळी कोणीतरी जर्सीवर लाल रंग नसल्याचं लक्षात आणून दिलं. खरंतर आयसीसीने सुरुवातीला जर्सीवर लाल रंग वापरू नका, असं सांगितलं होतं.'
नजमुल हसन जरी असं म्हणत असले तरी क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार आयसीसीने बांगलादेशला लाल रंग वापरू नका, असं सांगितलं नव्हतं. तर जर्सीवरचं नाव किंवा क्रमांक लाल रंगातला नसावा. मुख्य रंग हिरवा असल्यामुळे लाल रंग वापरला तर वाचायला कठीण जातं, म्हणून आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला असं सांगितलं होतं.
लाल पट्टीवर पांढऱ्या रंगात नाव लिहिलेल्या बांगलादेशच्या जर्सीला आयसीसीने परवानगी दिली होती. यानंतर बांगलादेशने तीन वेगवेगळ्या डिझाईनच्या जर्सीचा पर्याय आयसीसीला दिला. यानंतर आयसीसीने हिरव्या रंगावर लाल रंग न वापरण्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगितलं.