नवी दिल्ली : आयसीसी वर्ल्ड कप जिंकून भारताला आज ९ वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ साली भारताने धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप काबीज केला होता. हा ऐतिहासिक विजय मिळवताना धोनीने मारलेला सिक्स कायमच क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहिल. क्रिकइन्फो या वेबसाईटनेही वर्ल्ड कप विजयाला ९ वर्ष पूर्ण झाल्यामुळे धोनीने मारलेल्या त्या सिक्सचा फोटो ट्विटरवर शेयर केला. 'आजच्याच दिवशी २०११ साली या एका शॉटमुळे कोट्यवधी भारतीयांना जल्लोषाची संधी दिली,' असं ट्विट क्रिकइन्फोने केलं आहे.
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला मात्र हे ट्विट पसंत पडलं नाही. '२०११ वर्ल्ड संपूर्ण भारत, टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफने मिळून जिंकला होता, हे लक्षात ठेवा. एका सिक्सबद्दलचं तुमचं आकर्षण कमी करा,' असं ट्विट गंभीरने केलं आहे.
Just a reminder @ESPNcricinfo: #worldcup2011 was won by entire India, entire Indian team & all support staff. High time you hit your obsession for a SIX. pic.twitter.com/WPRPQdfJrV
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 2, 2020
धोनीने या मॅचमध्ये विजय मिळवून देणारी खेळी केली असली तरी गौतम गंभीरनेही ९७ रनची महत्त्वाची खेळी केली होती. गंभीरने इशाऱ्या इशाऱ्यामध्येच धोनीवरही निशाणा साधला आहे. गंभीर आणि धोनी यांच्यामधल्या वादांनी अनेकवेळा तोंड वर काढलं होतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये गंभीर, सचिन आणि सेहवाग या तिघांपैकीच दोघांना आळीपाळीने खेळवण्यात येईल, कारण हे तिघंही फिल्डिंगमध्ये चपळ नाहीत, असं धोनी म्हणाला होता. धोनीच्या या निर्णयावर गंभीरने अनेकवेळा टीका केली आहे. तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडेमध्ये धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला होता. त्यावेळीही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायची गरज नव्हती, असं म्हणत गंभीरने धोनीला टोला लगावला होता.
२०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धोनीमुळे शतक हुकल्याचंही गंभीर म्हणाला होता. धोनीसोबत बॅटिंग करत असताना त्याने तू शतकाजवळ आहेस, त्यामुळे सावकाश खेळ असं सांगितलं होतं. धोनीने हे सांगितल्यामुळे माझी एकाग्रता भंग झाली, असं काहीच दिवसांपूर्वी गंभीरने सांगितलं होतं.