Yuvraj Singh: युवराज सिंह लोकसभा निवडणूक लढवणार? अखेर फायटर किंगने दिलं स्पष्टीकरण

Yuvraj Singh: टीम इंडियाला 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंगची मोठी भूमिका होती. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 2, 2024, 10:36 AM IST
Yuvraj Singh: युवराज सिंह लोकसभा निवडणूक लढवणार? अखेर फायटर किंगने दिलं स्पष्टीकरण title=

Yuvraj Singh: आगामी काळात लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंहसंदर्भात अनेक बातम्या समोर येत होत्या. यावेळी तो गुरुदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतो अशी चर्चा होती. मात्र, शुक्रवारी खुद्द युवराज सिंगने या बातम्यांचं खंडन केले.

युवराज सिंहच्या म्हणण्यानुसार, या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाहीये. त्याच्या सोशल मीडिया हँडल X वर एक पोस्ट शेअर करताना युवराज सिंगने स्पष्ट केले की, तो गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. टीम इंडियाला 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंगची मोठी भूमिका होती. 

काय म्हणाला युवराज सिंह?

युवराज सिंग म्हणाला, 'मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. लोकांना पाठिंबा देणे आणि मदत करणे ही माझी आवड आहे. मी माझ्या फाऊंडेशन 'YOUWECAN' द्वारे हे काम करत राहणार आहे. आपण आपल्या क्षमतांसह बदल घडवत राहू या. 

YouWeCan फाउंडेशन ही युवराज सिंहची एनजीओ आहे. ही एनजीओ खास करून कॅन्सरच्या रुग्णांना मदत करते. 2011 च्या वर्ल्डकपनंतर जेव्हा युवराज सिंग त्याच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अमेरिकेत गेला तेव्हा त्याने YouWeCan फाउंडेशन सुरू केली होती.

भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यात मोलाचा वाटा

एक नव्हे तर भारताला 2 वर्ल्डकप जिंकवून देण्यामध्ये युवराज सिंहचा मोलाचा वाटा आहे. 2007 T20 वर्ल्डकप आणि 2011 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये युवराज सिंग 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' ठरला होता. युवराज सिंहने 2003 वनडे वर्ल्डकप, 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे विश्वचषक भारताकडून खेळला. 

2019 मध्ये घेतला निवृत्तीचा निर्णय

युवराज सिंहने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराज सिंगने भारतासाठी 304 वनडे सामन्यांमध्ये 36.55 च्या सरासरीने 8701 रन्स केलेत. ज्यामध्ये 14 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.