IND vs ENG Ranchi Test : रांचीच्या झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना (IND vs ENG 4th Test) खेळवला जाणार आहे. अशातच चौथ्या सामन्याआधी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) चौथ्या कसोटी सामन्यात आराम देण्यात आलाय. तर केएल राहुल दुखापतीमधून अजूनही बरा झालेला नाही. तर दुसरीकडे मुकेश कुमारचं (Mukesh Kumar) टीम इंडियामध्ये कमबॅक झालंय. त्यामुळे टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये कभी खुशी कभी गम असा माहोल असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता विराट कोहलीच्या तालमीत तयार झालेल्या एका स्टार खेळाडूचं नशीब फळफळणार असल्याचं चित्र दिसतंय.
मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात बुमराहने किती क्रिकेट खेळलाय हे लक्षात घेऊन त्याला आराम देण्यात आल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. अशातच आता एकतर शमी नाही, त्यात आता बुमराह देखील नसेल. त्यामुळे टीम इंडिया गोलंदाजीमध्ये नव्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता टीम इंडियामध्ये संधीची वाट पाहत असलेल्या आकाश दीपला (Akash Deep) संधी मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंड लाएन्सविरुद्घ खेळल्या गेलेल्या सामन्यात 27 वर्षाच्या आकाश दीपने भेदक गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला टीम इंडियाच्या प्रमुख संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. सध्या टीम इंडिया 2-1 ने पुढं असल्याने आता आगामी सामन्यात नव्या छाव्यांना संधी देणार का? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, हैदराबाद कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं अन् विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे. त्यामुळे आता रोहितसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.