मुंबई : T-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान या सामन्यानंतर एक खास गोष्ट घडली, ज्याकडे सर्वांचे लक्ष गेलं. भारताचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी एकमेकांच्या कानात काहीतरी सांगितलं.
आता याच संभाषणाबद्दल बाबर आझमला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विराट कोहलीसोबत नेमकं काय बोलणं झालं असा प्रश्न बाबरला विचारण्यात आला. ज्यावर बाबर आझम याने, आमच्यामध्ये झालेलं बोलणं मला सर्वांसमोर सांगायला आवडणार नाही, असं म्हटलंय.
पाकिस्तानी पत्रकाराला बाबरला असंही विचारायचं होतं की, विराट कोहलीला नुकतंच दोन फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलंय, त्यामुळे तुझं त्याच्यावर काय म्हणणं आहे? मात्र, पाकिस्तानी संघाच्या मीडिया मॅनेजरने या प्रश्नाचं उत्तर देऊ दिलं नाही. ही पत्रकार परिषद केवळ वेस्ट इंडिज मालिकेबाबत असल्याचं मीडिया मॅनेजरकडून सांगण्यात आलं.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होता, ज्यात त्यांना दहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.