Irfan Pathan On Ishan kishan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा (Indian Squad for final three Tests Announced) झाली. टीम इंडियामध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचं कमबॅक झालंय. अशातच आकाश दीप या युवा खेळाडूला संघात स्थान देण्यात आलंय. मात्र, पुन्हा एकदा इशान किशनला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. अशातच आता इशान टीम इंडियामध्ये खेळण्यास नकार का देतोय? असा सवाल विचारला जात आहे. मानसिक आरोग्य ठिक नसल्याचं कारण देऊन इशानने (Ishan kishan) रजा घेतलीये. मात्र, त्यावर आता पुन्हा टीका होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने इशानच्या कानपिचक्या घेतल्या आहेत.
Irfan Pathan काय म्हणाला?
कोणीतरी सराव करण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त कसा असू शकतो? पण देशांतर्गत क्रिकेट खेळू शकत नाही हे गोंधळून टाकणारं आहे. यालाही अर्थ कसा काय? असा सवाल इरफान पठाणने उपस्थित केला आहे. इरफानने केलेल्या पोस्टमुळे आता क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.
Finding it perplexing how someone can be fit enough to practice but not play domestic cricket. How does this even make sense?
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 10, 2024
मी आधीच सांगितलं आहे की, जर तुम्हाला इशानला ठेवायचं असेल तर सलामीला खेळवावे लागेल, मग टी- 20 असो किंवा एकदिवसीय. पहिल्या चार जागी सध्या खेळाडूंचा पर्याय अधिक असल्याने संघ व्यवस्थापन गोंधळात पडले आहे. इशानसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. बीसीसीआयने त्याचे स्थान बनवावे अन्यथा जितेश शर्माचा विचार करावा, असं इरफान पठाण याने काही दिवसापूर्वी म्हटलं होतं.
दरम्यान, आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने विकेटकीपर म्हणून तीन नावं चर्चेत आहेत. के.एल. राहुल, इशान किशन आणि जितेश शर्मा... या तिन्ही खेळाडूंपैकी दोन खेळाडूंना संघात स्थान मिळणार आहे. त्यामुळे आता इशान बाहेरच राहिला तर त्याला वर्ल्ड कप खेळण्याची संधी दिली जाईल का? असा सवाल विचारला जात आहे. आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
कोच राहुल द्रविड यांचा इशारा
टीममध्ये परतण्यासाठी इशान किशनला नियमितपणे क्रिकेट खेळण्याची गरज आहे. ईशानला सतत खेळावं लागेल. त्यानंतरच त्याला संघात घेण्याचा विचार केला जाईल, असं म्हणत राहुल द्रविड यांनी इशान किशनला सुचक इशारा दिला आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील इशान किशनच्या सतत संपर्कात आहे, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.