मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाराच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आलं. लारा हा वर्ल्ड कपसाठी स्टार स्पोर्ट्सवर क्रिकेटचं विश्लेषण करत आहे. यासाठी तो भारत दौऱ्यावर आला आहे. लाराच्या तब्येतीविषयी माहिती देण्यासाठी ग्लोबल रुग्णालय लवकरच प्रसिद्धी पत्रक देणार आहे.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाबाद ५०१ रनचा विक्रम लाराच्या नावावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये ४०० रन करण्याचा विक्रमही लाराने केला आहे. अजूनही लाराचं हे रेकॉर्ड कोणत्याही क्रिकेटपटूला मोडता आलं नाही.
ब्रायन लारा वेस्ट इंडिजकडून १९९० ते २००७ या कालावधीमध्ये १३१ टेस्ट आणि २९९ वनडे खेळला. १३१ टेस्ट मॅचमध्ये लाराने ११,९५३ रन केले, यामध्ये ३४ शतकं आणि ४८ अर्धशतकांचा समावेश होता. तर २९९ वनडेमध्ये त्याने १०,४०५ रन केले. लाराने वनडेमध्ये १९ शतकं आणि ६३ अर्धशतकं केली आहेत.
२००७ साली लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २१ एप्रिल २००७ साली इंग्लंडविरुद्ध लारा शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. लारा हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता, पण नंतर सचिन तेंडुलकरने त्याचा विक्रम मोडला.