टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून सुरुवात होतेय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अमेरिकेत दाखल झालीय. पण अमेरिकेत दाखल होताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

राजीव कासले | Updated: Jun 1, 2024, 09:12 PM IST
टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती title=

Dinesh Karthik Retirement : आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करणारा आणि टीम इंडियासाठी (Team India) 89 सामने खेळणाऱ्या विकेटकिपर-फलंदाजी दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा (Retirement) केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिनेश कार्तिकने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. टी20 वर्ल्ड कपसाठी दिनेश कार्तिक अमेरिकेत दाखल झालाय. दिनेश कार्तिकचा कॉमेंट्री पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये दिनेश कार्तिकने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 

दिनेश कार्तिकने शेअर केली पोस्ट
दिनेश कार्तिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात एक छोटी व्हिडिओ क्लिपही आहे. या व्हिडिओत त्याने क्रिकेट मैदानाशी जोडल्या काही आठवणी फोटोच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. यासोबत त्याने एक नोट लिहिली असून यात त्याने म्हटलंय 'गेल्या काही दिवसांत मला मिळालेली आपुलकी, पाठिंबा आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. सर्व चाहत्यांचे आभार. बराच वेळ विचार केल्यानंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी अधिकृतपणे माझ्या निवृत्तीची घोषणा करत आहे आता मी नवीन आव्हानांसाठी सज्ज होत आहे' असं कार्तिकने म्हटलंय.

सर्वांचे आभार मानले
कार्तिकने पुढे आपपल्या पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. 'मी माझे सर्व प्रशिक्षक, कर्णधार, निवड समिती, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांचे आभार व्यक्त करु इच्छितो. त्यांच्या पाठिंब्यामुळे क्रिकेटमधला माझा प्रवास सुखदत आणि आनंददायी झाला. आपल्या देशात क्रिकेट खेळणाऱ्या लाखो खेळाडूंमधून मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. अनेक चाहते आणि मित्रांचा मला पाठिंबा मिळाला'

आई-वडिलांचाही केला उल्लेख
दिनेश कार्तिकने आपल्या पोस्टमध्ये आई-वडिलांचाही विशेष उल्लेख केला आहे. 'माझे आई-वडील इतकी वर्ष माझ्यामागे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आता जो मी आहे तो नसतो. मी दीपिका (पत्नी) हिचा देखील खूप आभारी आहे, ती स्वतः एक व्यावसायिक खेळाडू आहे, पण मला पाठिंबा देण्यासाठी तीने अनेकदा आपल्या खेळाला ब्रेक लावला. 

2013 चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकली
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. विजेत्या संघात दिनेश कार्तिकचाही समावेश होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सान्यात इंग्लंडविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कार्तिकचा समावेश होता. हा सामना भारताने पाच धावाने जिंकला होता.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. या जोरावर त्याला टी20 वर्ल्ड कपमध्येही संधी मिळाली. पण आयपीएलचा फॉर्म टी20 वर्ल्ड कपमध्ये दाखवता आला नाही. टी20 वर्ल्ड कपमध्ये कार्तिकला 4 सामन्यात केवळ 14 धावा करता आल्या. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या सतराव्या हंगामातही कार्तिकने दमदार कामगिरी केली. त्याने 326 धावा केल्या. पण टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही.

दिनेश कार्तिकची क्रिकेट कारकिर्द
2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिक तब्बल 20 वर्ष खेळला. एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने आंतरराष्ट्रायी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. टीम इंडियासाठी कार्तिक 94 एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने 1752 धावा केल्या. तर 26 कसोटी सामन्यात 1025 धावा केल्या. 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या नावावर 686 धावा जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर केवळ एक शतक जमा आहे. आयपीएलमध्ये कार्तिक तब्बल 257 सामने खेळला. यात त्याने 4842 धावा केल्या.