रोहित शर्मा लाईव्ह चॅटवेळी भडकला, 'हिंदी'बद्दल म्हणाला...

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असल्यामुळे जवळपास सगळ्याच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

Updated: Apr 2, 2020, 11:31 PM IST
रोहित शर्मा लाईव्ह चॅटवेळी भडकला, 'हिंदी'बद्दल म्हणाला... title=

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असल्यामुळे जवळपास सगळ्याच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा फटका आयपीएललाही बसला आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण भारतातली सध्याची परिस्थिती बघता १५ एप्रिलपासूनही आयपीएल सुरू व्हायची शक्यता कमी आहे. भारतीय क्रिकेटपटू मात्र आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यामुळे घरातच विश्रांती घेत आहे.

क्रिकेटपासून लांब असलेले रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत होते. या लाईव्ह चॅटदरम्यान रोहित शर्मा एका चाहत्यावर भडकला. एका चाहत्याने रोहित शर्माला इंग्रजीमध्ये बोलायला सांगितलं. रोहितला मात्र चाहत्याचं हे बोलणं आवडलं नाही. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदीमध्येच बोलणार, असं रोहितने सुनावलं. २०१५ साली मेलबर्नच्या मैदानात डेव्हिड वॉर्नर आणि रोहित यांच्यात हिंदीत बोलण्यावरून बाचाबाची झाली होती.

मी मुलाखतींमध्ये इंग्रजी बोलीन, पण यावेळी मी घरात आहे, असं रोहित म्हणाला. जसप्रीत बुमराहने मात्र बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न केला. 'जेव्हा आम्ही इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा चाहते हिंदीमध्ये बोला म्हणतात, तर हिंदीमध्ये बोललो तर इंग्रजीत बोला, असं सांगतात,' अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली.

काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्मा युझवेंद्र चहल आणि केव्हिन पीटरसन यांच्याशीही इन्स्टाग्रामवरुन बातचित केली. आयपीएलपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सगळं सुरळीत झाल्यावर आयपीएल स्पर्धा होईल, असं रोहितने चहल आणि पीटरसनशी बोलताना सांगितलं.