मुंबई : स्थानिक क्रिकेटमध्ये रेकॉर्डचा पाऊस पाडणाऱ्या वसीम जाफरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल खंत व्यक्त केली आहे. ११ वर्षांपूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कटू आठवणी मी आजही विसरू शकत नाही. २००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रेट लीनं टाकलेले वेगवान बॉल मला खेळता आले नाहीत, यामुळे माझी आंतरराष्ट्रीय कारकिर्द बर्बाद झाली, असं वक्तव्य वसीम जाफरनं केलं.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये वसीम जाफर म्हणतो, 'मला ब्रेट लीचे बॉल खेळताना त्रास झाला, याचा मी स्वीकार करतो. ब्रेट लीचे बॉल कसे खेळावे, हेच मला समजत नव्हतं.'
परदेशी जमिनीवर जाफरच्या कारकिर्दीची सुरुवात ठीकठाक होती. २००६ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध जाफरनं द्विशतक केलं होतं. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही त्यानं चांगल्या रन केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्येही जाफरनं रनचा डोंगर उभारला. पण २००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या खराब कामगिरीमुळे जाफर पुन्हा भारताकडून खेळला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या आठवणींना उजाळा देताना जाफर म्हणाला, '२००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल विचार करतो, तेव्हा मला वाटतं की माझं मन अशांत होतं, पण ही परिस्थिती फार काळ नव्हती. मी कठोर परिश्रम केले, पण पुन्हा गोष्टी मला हव्या तशा झाल्या नाहीत. ही अल्लाहची मर्जी होती. तुम्हाला तेवढच मिळतं, ज्याचे तुम्ही हकदार असता. त्यापेक्षा अधिक कधीच मिळत नाही. भारतासाठी मी जास्त काळ खेळू शकलो नाही, याचं मला दु:ख नाही.'
वसीम जाफरला भारतीय क्रिकेटमधला 'मिस्टर क्रिकेट' म्हणून ओळखलं जातं. वसीम जाफर १० वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचा हिस्सा होता. यातल्या ८ वेळा तो मुंबईकडून आणि २ वेळा विदर्भाकडून खेळला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक रन या जाफरनं केल्या आहेत. याचबरोबर दुलीप ट्रॉफी आणि ईराणी ट्रॉफीमध्येही जाफरनं खोऱ्यानं रन काढल्या. यावर्षीच्या रणजी ट्रॉफीमध्ये जाफरनं १ हजाराहून अधिक रन केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाफरनं ३१ टेस्टच्या ५८ इनिंगमध्ये ३४.११ च्या सरासरीनं १९४४ रन केले. जाफरला फक्त २ वनडे मॅच खेळण्याचीच संधी मिळाली. यामध्ये त्यानं १० रन केले. जाफरला आयपीएलमध्येही फार संधी मिळाली नाही. ८ आयपीएलच्या ८ इनिंगमध्ये त्यानं १३० रन केल्या.