प्रॅक्टिस कमी, पार्ट्या जास्त; सेहवागचा डेव्हिड वॉर्नरवर गंभीर आरोप

टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने वॉर्नरबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: May 7, 2022, 03:23 PM IST
प्रॅक्टिस कमी, पार्ट्या जास्त; सेहवागचा डेव्हिड वॉर्नरवर गंभीर आरोप title=

मुंबई : स्फोटक फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचं नाव हमखास घेतलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये वॉर्नरच्या नावे अनेक वाद-विवादही जोडण्यात आले. वाद सनरायझर्स हैदराबादविषयी असेल किंवा बॉल टॅम्परिंग असो, वॉर्नरचं नाव यामध्ये जोडण्यात आलं होतं. दरम्यान याचवरून आता टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. 

विरेंद्र सेहवाग ज्यावेळी पहिल्यांदा दिल्लीचा कर्णधार होता त्यावेळी डेव्हिड वॉर्नर याच टीममधून खेळत होता. डेव्हिड वॉर्नर प्रथमच सेहवागच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळत होता. यादरम्यान त्याने सांगितले की, डेव्हिड वॉर्नरला सांभाळणं खूप कठीण होतं कारण तो ड्रेसिंग रूममध्येही खेळाडूंशी भांडायचा. 

प्रॅक्टिसपेक्षा पार्ट्या अधिक

डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला की, मी अनेक खेळाडूंवर राग काढला आहे. त्यापैकी एक डेव्हिड वॉर्नर आहे. जेव्हा तो पहिल्यांदा आयपीएलचा भाग बनला तेव्हा त्याचे लक्ष सरावापेक्षा पार्ट्या करण्यावर जास्त होतं. पहिल्याच वर्षी त्याची अनेक खेळाडूंशी भांडणं झाली. त्यानंतर त्याला शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीममधून वगळण्यात आलं होतं.

तो पुढे म्हणाला की, कधीकधी तुम्हाला युवा खेळाडूंना सांगावं लागते की ते टीममध्ये एकटे नाहीत इतर खेळाडूही टीममध्ये आहेत. संधी मिळाल्यावर ते खेळाडूही चांगली कामगिरी करू शकतात. त्याच्या अनुपस्थितीनंतरही टीमने शेवटचे दोन्ही सामने जिंकले होते.