विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी झालेल्या रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा ३ विकेटने पराभव झाला. यानंतर देखील कर्णधार विराट कोहली समाधानी आहे. पहिल्या बॉलपासून मैदानात आक्रमक असणारा विराट कोहली या पराभवानंतर मात्र शांत होता. विराटनं पराभवानंतरही समाधान व्यक्त केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'बॉलरनी केलेली कामगिरी चांगली होती. मी त्यांच्या कामगिरीवर खुश आहे. आम्ही ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या १२७ रनचे आव्हान दिले होते. त्यामुळे ही मॅच इतकी अटीतटीची आणि रंगतदार ठरेल असे वाटले नव्हते. जसप्रीत बुमराह आणि मयांकने चांगली बॉलिंग केली', असे मॅच संपल्यानंतर कोहली म्हणाला.
कोहलीने केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीचे कौतुक केले. 'राहुलने चांगली खेळी केली. आमच्या दोघांमध्ये ५५ रनची भागीदारी झाली. या मैदानावर आम्ही १५० रन केल्या असत्या तर आम्ही ही मॅच जिंकलो असतो. या मैदानात विजयासाठी १५० रन खूप आहेत. पण ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ करुन विजय आपल्याकडे ओढून घेतल्याची प्रतिक्रिया कोहलीनं दिली.
ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये १४ रनची गरज होती. पण उमेश यादवला ही धावसंख्या रोखता आली नाही. उमेश यादवच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचे तळाचे बॅट्समन पॅट कमिन्स आणि जॉय रिचर्डसन या दोघांनी प्रत्येकी ७ रन करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या मॅच मध्ये तीन विकेट घेणाऱ्या कुल्टर नाईलला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याने दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या आणि केएल राहुल या तिघांना तंबूत पाठवले.
पहिल्या टी-२० मॅचमध्ये विजयासोबत दोन मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला दुसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवणे बंधनकारक झाले आहे.