मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त दौऱ्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या सुट्टीची मजा घेतोय. विराटच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला. भारतानं ही टेस्ट सीरिज २-१नं जिंकली. तर यापाठोपाठ झालेल्या वनडे सीरिजमध्येही भारताचा २-१नं विजय झाला. यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यात विराटच्या नेतृत्वात भारतानं पहिल्या तीन वनडे जिंकत तिकडेही सीरिजवर नाव कोरलं. उरलेल्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं विराट कोहलीनं त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. काल रात्री विराट आणि अनुष्का व्हॅलेंटाईन डे निमित्त डिनरला गेले होते. तेव्हाचा फोटो विराटनं शेअर केला आहे.
About last night with my valentine. #greatmeal #nueva #loveit @AnushkaSharma @nueva_world pic.twitter.com/DaKRA90ocS
— Virat Kohli (@imVkohli) February 14, 2019
विराट कोहलीला नुकतेच आयसीसीचे टॉप-३ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आयसीसीनं विराटला २०१८ सालचा टेस्ट आणि वनडेमधला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आणि टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार या पुरस्कारांची घोषणा केली.
विराट कोहलीनं २०१८ साली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन केल्या. विराटनं मागच्यावर्षी १४ मॅचमध्ये १३३.५५ च्या सरासरीनं १,२०२ रन केले. यामध्ये ५ शतकं आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता. याचबरोबच विराटनं २०१८ साली टेस्ट क्रिकेटमध्ये १३ मॅचमध्ये १,३२२ रन केले. वनडे प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्येही विराट कोहली २०१८ वर्षात सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. २०१८ मध्ये विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ शतकं आणि ५ अर्धशतकं केली.
परी, संजू, सुई धागा आणि झिरो या चित्रपटांमधल्या अभिनयाबद्दल अनुष्का शर्माचंही कौतुक करण्यात आलं.
विराटच्या नेतृत्वात आता भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. यानंतर विराट कोहली आयपीएलमध्ये बंगळुरूच्या टीमचं नेतृत्व करेल. आयपीएल संपल्यानंतर भारत वर्ल्ड कप खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होईल.