इंदूर : २०१९ साली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने २०२० सालच्या पहिल्याच मॅचमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. भारताने ही मॅच १५ बॉल बाकी असतानाच जिंकली. कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये नाबाद ३० रन केले.
२०१९ या वर्षात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होता. पण वर्षाच्या शेवटी दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी २,६३३-२,६३३ रन केले.
रोहित शर्माच्या पुढे जायला विराट कोहलीला फक्त एका रनची गरज होती. श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली, त्यामुळे दुसऱ्या टी-२० मध्ये विराट कोहली रोहितच्या पुढे गेला.
विराट कोहलीने ७७ टी-२० मॅचमध्ये ५३.२६ च्या सरासरीने आणि १३८.४० च्या स्ट्राईक रेटने २,६६३ रन केले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा सर्वाधिक स्कोअर नाबाद ९४ रन आहे. रोहितने १०४ मॅचमध्ये ३२.१० ची सरासरी आणि १३८.२१ च्या स्ट्राईक रेटने २,६३३ रन केले आहेत. रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकंही केली आहेत. विराटला मात्र १०० रनचा आकडा गाठता आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितनंतर सर्वाधिक रन न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने केले आहेत. गप्टीलच्या नावावर २,४३६ रन केले आहेत. तर शोएब मलिकने २,२६३ रन, ब्रॅण्डन मॅक्कलमने २,१४० रन, डेव्हिड वॉर्नरने २,०७९ रन, इयन मॉर्गनने २००२ रन, अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने १,९३६ रन, जेपी ड्युमिनीने १,९३४ रन आणि आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने १,९२९ रन केले आहेत.