₹173 कोटी, 0 ट्रॉफी... तरीही विराटला RCB नेहमी का करते Retain? खरं कारण...

Virat Kohli IPL Salary Why He Is Never Auctioned: विराट कोहली हा पहिल्या पर्वापासून आरसीबीकडूनच खेळत आहे. मागील अनेक पर्वांपासून त्याने घसघशीत मानधन घेतलं आहे. पण विराट कधीच लिलावामध्ये का सहभागी झाला नाही माहितीये का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 10, 2024, 04:36 PM IST
₹173 कोटी, 0 ट्रॉफी... तरीही विराटला RCB नेहमी का करते Retain? खरं कारण... title=
विराट कोहली सुरुवातीपासूनच आरसीबीमध्ये

Virat Kohli IPL Salary Why He Is Never Auctioned: इंडियन प्रिमिअर लिग 2025 चा लिलाव अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. यंदा आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये कोणकोणते खेळाडू सहभागी होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. खरं तर कोणत्या खेळाडूंना संघ रिटेन करणार आणि कोणाला करारमुक्त करणार यावर कोणकोणते खेळाडू करारामध्ये सहभागी होणार हे ठरेल. दरम्यान अनेक बडे खेळाडू पहिल्यांदाच लिलावामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात असताना या संभाव्य यादीमध्ये विराट कोहलीचाही समावेश अनेकांनी केला आहे.

विराटला कधीच लिलावात सामावून घेतलं नाही

खरं तर आयपीएलचा लिलाव म्हटल्यावर विराटचं नाव अनेकदा चर्चेत येतं. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की विराट कोहली एवढा लोकप्रिय आहे, त्याची एवढी क्रेझ आहे तरीही त्याला कधी आयपीएलमध्ये लिलाव झाला नाही. विराट आतापर्यंत असा एकमेव खेळाडू आहे तो आतापर्यंतची सर्व पर्व एकाच संघाकडून खेळला आहे. मात्र तो ज्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सकडून खळतो त्या संघानेही त्याला लिलावाच्या माध्यमातून करारबद्ध केलेलं नाही. यामागील कारण फारच रंजक आहे.

..तर आरसीबी नाही या संघात असता विराट

विराट कोहली सर्वात आधी 2008 साली आरसीबीकडून खेळला. हे आयपीएलचं पहिलं पर्व होतं. त्यावेळी विराट हा भारताच्या 19 वर्षांखालील संघातील सदस्य होता. याच संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. विराटची या स्पर्धेतील कामगिरी पाहिल्यानंतर आरसीबीने त्याला थेट करारबद्ध केलं होतं. त्यावेळी 19 वर्षांखालील खेळाडूंना थेट प्रवेश दिला जात नसे. अशा खेळाडूंना मुख्य पर्वापूर्वी प्री सिझन ड्राफ्टच्या माध्यमातून संघात घेतलं जायचं. विराट कोहलीची 19 वर्षांखालील 2008 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी पाहून आरसीबीने त्याला करारबद्ध केलं. खास करुन दिल्ली कॅपिटल्सचा संघ विराटला संघात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आरसीबीने विराट आपल्याकडेच राहील याची विशेष काळजी घेतली. आरसीबीने विराटवर विशेष लक्ष ठेवलं नसतं तर कदाचित तो आज दिल्लीकडून खेळत असता.

...म्हणून कधीच लिलावात नाही

आरसीबीने विराट कोहलीला पहिल्या पर्वापासूनच करारबद्ध ठेवल्याने तो कधीच लिलावामध्ये सहभागी झाला नाही. विराट कोहलीची फलंदाजीची शैली आणि त्याचा संघावर असलेला विश्वास यामुळे आरसीबी फ्रेंचायझी सुद्धा विराटसाठी काहीही करायला तयार असते. म्हणूनच या दोघांमधील हे नातं वर्षानूवर्ष अधिक दृढ होत गेलं आहे. आरसीबीने विराटला कायमच रिटेन केलं आहे. यावरुनच तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं आहे. संघासाठी त्याने अनेक मैल्यवान खेळी केल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून विराट नावारुपाला आला आहे. 

खेळाडू... कर्णधार... खेळाडू...

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विराटने अवघ्या 5 वर्षांमध्ये आरसीबीचा कर्णधार होण्याचा मान मिळवला. विराटकडे 2013 साली आरसीबीचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. तेव्हापासून विराट म्हणजे आरसीबी आणि आरसीबी म्हणजे विराट हे समिकरण निश्चित झालं. विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ चारवेळा प्लेऑफ्सपर्यंत पोहोचला पण त्यांना जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. त्यामुळेच विराटने 2021 मध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 

विराटसाठी त्याची आकडेवारी बोलते

विराटने आयपीएलच्या 252 सामन्यांमध्ये 8004 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 38.67 च्या सरासरीने या धाव केल्या आहेत. विराटने 2016 च्या पर्वात एकट्याने 973 धावा केल्या होत्या. इतक्या धावा एकाच पर्वात आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने केलेल्या नाहीत. विराटने आयपीएलमध्ये 8 शतकं झळकावली आहेत. तर 55 वेळा त्याने 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्यात. 

आरसीबीने आतापर्यंत कधी आणि किती पैसा विराटला मानधन म्हणून दिला?

2008 ते 2010 दरम्यान तीन वर्ष प्रत्येक पर्वसाठी आरसीबीने विराटला 12 लाख रुपये मानधन दिलं. त्यानंतर 2011 ते 2013 या तीन वर्षांसाठी प्रत्येक पर्वाला विराटला 8.28 कोटी रुपये मानधन देण्यात आलं. पुढे 2014 ते 2017 या चार वर्षांसाठी दर वर्षी विराटला आरसीबीने एकूण 12.5 कोटी रुपये मानधन म्हणून दिले. विराटला 2018 ते 2021 या 4 वर्षांसाठी वर्षाला 17 कोटी रुपये मानधनाच्या रुपात दिले. त्यानंतर 2022 पासून दर पर्वाला विराटला 15 कोटी रुपये मानधन दिलं जात आहे. मागील 16 पर्वांमध्ये आरसीबीने विराटला पगार म्हणून 173 कोटी 20 लाख रुपये पगार दिला आहे.

यंदाही रिटेन?

सातत्य, क्षमता, फिटनेस, नेतृत्व यासारख्या गुणांमुळे विराटला पर्याय शोधणे आरसीबीला सध्या तरी अशक्य दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वातही विराटला आरसीबी रिटेन करेल असं वाटतं आहे.