लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. या पराभवामुळे ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. पहिली टेस्ट भारत ३१ रननी हरला होता. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला. इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं मॅचमध्ये एकूण ९ विकेट घेतल्या. यात पहिल्या इनिंगमध्ये त्यानं २० रन देऊन ५ विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्सनं १३७ रनची नाबाद खेळी करुन इंग्लंडला आणखी मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.
या पराभवानंतर विराटनं फेसबूकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. काही वेळा आम्ही जिंकतो तर काही वेळा शिकतो. तुम्ही आमची साथ सोडू नका आणि आम्हीही तुमची साथ सोडणार नसल्याचं आश्वासन देतो. पुढे आणि वरती जाऊ... अशी पोस्ट विराटनं शेअर केली आहे.
लॉर्ड्सवर आम्ही पराभवाच्या लायकच होतो, असं विराट कोहली म्हणाला. तसंच टीम निवडीमध्ये आमची चूक झाल्याची कबुली विराटनं दिली आहे. उमेश यादवला वगळून दोन स्पिनर घेणं ही चूक होती, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं उमेश यादवऐवजी कुलदीप यादवला संधी दिली होती.
लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ फुकट गेला. पहिल्या दिवशी टॉसही पडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मॅच सुरु झाली. दुसऱ्या दिवशीही लॉर्ड्सवर ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणात फास्ट बॉलरला फायदा मिळतो. हे माहित असताना देखील उमेश यादवला वगळून कुलदीप यादवला का संधी देण्यात आली असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. या टेस्ट मॅचमध्ये कुलदीप यादवनं ९ ओव्हरमध्ये ४४ रन तर अश्विननं १७ ओव्हरमध्ये ६८ रन दिले. या दोन्ही स्पिनरना एकही विकेट मिळाली नाही.
दुसऱ्या टेस्टदरम्यान विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली होती. मॅचच्या तिसऱ्या दिवशी काही काळ आणि चौथ्या दिवशी विराट फिल्डिंगला आला नव्हता. त्यामुळे नेहमी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या विराटला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागलं. विराटऐवजी अजिंक्य रहाणे बॅटिंगला आला होता. तिसऱ्या टेस्टआधी आपण फिट होऊ, असा विश्वास विराट कोहलीनं बोलून दाखवला. १८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.