मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले; अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेची लॉबिंग सुरु आहे.  सेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवारांकेड धाव घेतली. मात्र, भेटीसाठी आलेल्या तीन आमदारांची भेट अजित पवार यांनी नाकारली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 29, 2025, 09:34 PM IST
मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले; अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली title=

Maharashtra Guardian Minister : रागयगच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचं पालकमंत्रिपद तटकरे आणि गोगावलेंमध्ये विभागून देण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवार यांची भेट घेतली. याच संदर्भात अजित पवार यांना भेटायला गेलेल्या तीन आमदारांना मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले आहे. अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली आहे. 

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात विभागुन देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  रायगड आणि  संपूर्ण कोकणात आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला हवं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना दिलं. पण शिवसेनेच्या विरोधामुळं अवघ्या काही तासांत पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रजासत्ताकदिनाचं ध्वजवंदन आदिती तटकरेंच्या हस्ते पार पडल्यानंतर आता शिवसेना अधिकच आक्रमक झालीये. रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींसह अजितदादांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं भारत गोगावलेंनी सांगितलं.

पालकमंत्रिपदावरच्या वादाबाबत उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलीय. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून आमच्या एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना तीव्र आहेत . शिंदेंना रायगडमध्ये काय चाललंय याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय होईल असं सामंतांनी स्पष्ट केलय. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील बहिणीला पोरखं करणार नाहीत ते महिलांचा सन्मान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर पालकमंत्रिपदाचा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोडल्याचही चव्हाणांनी सांगितलं.