"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"

Delhi Wrestlers Protest: दिल्लीत बुधवारी आंदोलन करणारे कुस्तीवीर (Wrestlers) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) आमने-सामने आले होते. यानंतर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले होते. "हे दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकलो का?", अशी विचारणा तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 4, 2023, 12:41 PM IST
"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?" title=

Delhi Wrestlers Protest: दिल्ल्लीत गेल्या काही दिवसांपासून भारताचे कुस्तीवीर आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI president Brij Bhushan) यांच्याविरोधात कुस्तीवर आंदोलन करत असून त्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान जंतर मंतरवर (Jantar Mantar) हे आंदोलन सुरु असताना बुधवारी दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि आंदोलक कुस्तीवर आमने-सामने आले होते. दरम्यान, यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी कुस्तीवीर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले. आपल्यासह आंदोलन करणाऱ्या काही सदस्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे. 

"या परिसरात पाणी भरलं आहे. झोपण्यासाठी जागा नसल्याने आम्ही खाटा घेऊन इथे आलो आहोत. आम्ही जेव्हा खाटा घेऊन येत होतो तेव्हा धर्मेंद्र या पोलीस कर्मचाऱ्याने आम्हाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती," असं विनेश फोगाट व्हिडीओत सांगताना ऐकू येत आहे.

"ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत ते बृजभूषण सिंग घरात शांततेत झोपत आहेत. आम्ही फक्त खाटा आणत होतो. आता तुम्ही या पातळीवर जाऊन आमचा अपमान करणार का? आम्ही आमच्या आदरासाठी भांडत आहोत. आम्ही असे दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?," अशी विचारणा करताना विनेश फोगाटला अश्रू अनावर होत होते. 

दिल्लीत नेमकं काय घडलं?

दिल्लीत कुस्तीवीरांचं आंदोलन सुरु असून यावेळी पोलीस आणि त्यांच्यात राडा झाला. पोलिसांनी आमच्यावर हल्ला करत अत्याचार केला असा कुस्तीवारांचा आरोप आहे. या राड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत काही आंदोलन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत दोन कुस्तीवीरांवर हल्ला केल्याचा आरोप करत असल्याचं ऐकू येत आहे. व्हिडीओत ज्याच्यावर आरोप केले आहेत तो पोलीस कर्मचारी खाली बसलेला दिसत आहे. 

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासत कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. सीसीटीव्हीमधील प्रत्येक फ्रेम तपासली जाईल असं ते म्हणाले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

"पोलिसांनी आम्हाला मागे ढकलत धक्काबुक्की केली. त्यांनी ज्याप्रकारे आम्हाला हाताळलं ते पाहता मला देशासाठी यापुढे कोणतंही मेडल जिंकण्याची इच्छा नाही. जर आमची हत्या करायची असेल तर करा," असं विनेश फोगाटने रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. यावेळी तिने महिला पोलीस कर्मचारी हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

मला पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. तिथे एकही महिला पोलीस कर्मचारी का नव्हती? ते आम्हाला अशी वागणूक कशी काय देऊ शकतात? आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही अशा वागणुकीसाठी पात्र नाही. मद्यधुंद अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याने माझ्या भावालाही मारहाण केली असा आरोप तिने केला आहे.