दुबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विकेट घेणे प्रत्येक गोलंदाजांसाठी अभिमानास्पद आहे. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी सलग दोन सामन्यांत धोनीची विकेट घेतली. यानंतर वरुणचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो धोनीकडून टिप्स घेतांना दिसत आहे.
गुरुवारी चेन्नईविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यानंतर केकेआरने एक 16 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वरुण चक्रवर्ती चेन्नईचा कर्णधार धोनीशी चर्चा करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते आहे की, धोनी काही टिप्स देत आहे आणि वरुण ते काळजीपूर्वक ऐकत आहे.
चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर वरुणने धोनीबरोबर सेल्फी घेतला आणि म्हटलं होतं की, तो चेन्नईच्या मैदानावर तीन वर्षांपूर्वी प्रेक्षकांसोबत धोनीला खेळताना पाहत असे.
वरुण चक्रवर्तीने सलग दुसऱ्यांदा धोनीला आऊट केले. वरुणच्या गोलंदाजीवर चार बॉलमध्ये फक्त एक रन काढून तो आऊट झाला. याआधी कोलकाता आणि चेन्नई यांच्यात खेळलेल्या सामन्यात धोनीला केवळ 11 धावा करता आल्या आणि वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला होता.
आयपीएलच्या या हंगामात वरुण चक्रवर्तीच्या शानदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी त्यांची टी-20 संघात निवड झाली आहे. वरुण चक्रवर्तीने नुकतीच दिल्ली कॅपिटल विरुद्ध शानदार गोलंदाजी केली. चार ओव्हरमध्ये त्याने 20 धावा देऊन 5 बळी घेतले आणि आयपीएल 2020 मध्ये 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.