अंडर-१९ वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताची खराब बॅटिंग, बांगलादेशला १७८ रनचं आव्हान

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमला खराब बॅटिंगचा फटका बसला आहे. 

Updated: Feb 9, 2020, 05:28 PM IST
अंडर-१९ वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताची खराब बॅटिंग, बांगलादेशला १७८ रनचं आव्हान title=
फोटो सौजन्य : क्रिकेट वर्ल्ड कप ट्विटर अकाऊंट

मुंबई : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमला खराब बॅटिंगचा फटका बसला आहे. ४७.२ ओव्हरमध्ये भारताचा १७७ रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून ओपनर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. तर टिळक वर्माने ३८ आणि ध्रुव जुएलने २२ रन केले. हे तीन भारतीय वगळता इतर कोणालाही दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. बांगलादेशकडून अविशेक दासने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शोरीफूल इस्लाम, तनझीम हसन सकीब यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. रकीबूल हसनला एक विकेट घेण्याय यश आलं.

बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या बॉलरनी अकबर अलीचा हा निर्णय योग्य ठरवला. बांगलादेशच्या अचूक माऱ्यासमोर भारताची सुरुवात अत्यंत धीमी झाली. मागच्या १३ इनिंगमध्ये पहिल्यांदाच भारताचा ऑल आऊट झाला आहे. १५६/४ अशी अवस्था असताना भारताची बॅटिंग गडगडली आणि पुढच्या २१ रनवर संपूर्ण टीम पॅव्हेलियनमध्ये परतली.

याआधी २०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपवरही भारताने नाव कोरलं होतं. आता ही ट्रॉफी वाचवण्याचं खडतर आव्हान भारतीय बॉलरपुढे असणार आहे. भारतीय टीमने आतापर्यंत ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारत अंडर-१९ वर्ल्ड कप चॅम्पियन बनला होता.