मुंबई : मुंबईचे वानखेडे स्टेडियम महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा संघ चेन्नईसाठी लकी ठरले. या संघाने रविवारी अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले. चेन्नईचा संघ आयपीएल २०१८मध्ये तीन वेळा या मैदानावर खेळला आणि तीनही वेळी या संघाला विजय मिळवण्यात यश मिळाले. पहिल्या दोन सामन्यांत चेन्नईचा पराभव होता होता राहिला होता. मात्र तिसऱ्या आणि फायनल सामन्यात शेन वॉटसनच्या ११७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईला हा सहज विजय साकारता आला.
हे जेतेपद जिंकण्यासोबतच एका आकड्याची सध्या चर्चा होतेय. हा आकडा आहे ७. याच नंबरची जर्सी धोनी घालतो. हा नंबर धोनी आणि त्याच्या संघासाठी चांगलाच लकी ठरलाय. या गोष्टीला खुद्द धोनीनेही स्वीकारलेय़. चेन्नईसाठी यंदा ७ आकडा शुभ ठरला. चेन्नई सातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आणि जेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला. धोनीच्या जर्सीचा नंबरही ७ आहे आणि धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने फायनलमध्ये विजय मिळवून तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवली.
चेन्नईसाठी डावाची सुरुवात करणारा शेन वॉटसनसाठीही ७ नंबर लकी आहे. ३६ वर्षीय शेन वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावा तडकावल्या. त्याच्या या दमदार खेळीमुळे चेन्नईला हा विजय साकारता आला. शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली.