धक्कादायक। इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'या' खेळाडूंना कोरोनाची लागण

 इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Updated: Jun 23, 2020, 08:41 AM IST
धक्कादायक। इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'या' खेळाडूंना कोरोनाची लागण title=
छाया सौजन्य - twitter@TheRealPCBMedia

इस्लामाबाद : कोरोनाचे संकट आता क्रीडा क्षेत्रात दिसून येत आहे. याआधीही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. आता नव्याने पाकिस्तानच्या खेडाळूंची भर पडली आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी मुकावे लागणार आहेत. पाकिस्तानला हा मोठा झटका आहे.  इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ तीन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाकिस्तानच्या शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे हे तिघे कोरोनाबाधित असल्याने त्यांना आता या दौऱ्यावर जाता येणार नाही. परदेश दौऱ्यावर निघण्याआधी पाक क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची चाचणी घेतली होती. ज्यात या खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

२८ जून रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे वैद्यकीय पथक या तिन्ही खेळाडूंच्या संपर्कात असून या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तशा सूचना देण्यात आल्या होत्या. शादाब खान हा लेगस्पिनर असून उर्वरित दोन खेळाडू हे तुलनेने नवे आहेत.

हारीस रौफ याने आतापर्यंत दोन टी-२० सामने खेळले असून हैदर अलीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा होता. या तीन खेळाडूंव्यतिरीक्त इमाद वासिम, उस्मान शिनवारी यांचीही रावळपिंडी येखे चाचणी घेण्यात आली. ज्यात त्यांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. २४ जून रोजी हे खेळाडू लाहोरसाठी रवाना झाले होते. पाक संघातील सर्व खेळाडूंना दौऱ्यावर रवाना होण्याआधी कोरोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले होते.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी २९ जणांची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाकिस्तान संघात राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे. यातील काहीना संधी मिळू शकते.