'मागच्या १५-२० वर्षातल्या टीमपेक्षा ही टीम परदेशात चांगली खेळली'

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला आहे. 

Updated: Sep 5, 2018, 10:20 PM IST
'मागच्या १५-२० वर्षातल्या टीमपेक्षा ही टीम परदेशात चांगली खेळली' title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला आहे. पण तरीही भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्रीनं या भारतीय टीमचं कौतुक केलं आहे. टीमचं कौतुक करत असतानाच रवी शास्त्रीनं मागच्या १५-२० वर्षांमधल्या भारतीय टीमवर निशाणा साधला आहे. मागच्या १५-२० वर्षांमध्ये भारतीय टीममध्ये काही दिग्गज क्रिकेटपटू होते. पण त्या टीमपेक्षा ही टीम परदेशामध्ये चांगली खेळली असल्याचं मत रवी शास्त्रीनं व्यक्त केलं आहे. मागच्या ३ वर्षांमध्ये भारतानं ९ मॅच आणि ३ सीरिज जिंकल्या, असं रवी शास्त्री म्हणाला आहे. या ३ सीरिजपैकी २ सीरिज श्रीलंकेत आणि १ वेस्ट इंडिजमध्ये जिंकली आहे.

पहिली टेस्ट भारतानं ३१ रननं गमावली आणि चौथ्या टेस्टमध्ये ६० रननं पराभव पत्करावा लागला. या दोन्ही मॅचमध्ये बॅट्समननी योग्य शॉट मारले असते तर निकाल वेगळे लागले असते, अशी प्रतिक्रिया शास्त्रीनी दिली आहे.

चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा ऑफ स्पिनर मोईन अलीला मॅचमध्ये ९ विकेट मिळाल्या. पण अश्विनला अशी कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या टेस्टवेळी अश्विनला दुखापत झाली होती. त्यामुळे चौथ्या टेस्टमध्ये दुखापत असतानाही अश्विनला खेळवलं का? असा प्रश्न रवी शास्त्रीना विचारण्यात आला. तेव्हा अश्विन फिट होता. पण मोईन अलीनं केलेल्या कामगिरीचं श्रेय त्याला द्यावं लागेल, असं शास्त्री म्हणाले.

भारतीय ओपनरच्या कामगिरीचीही शास्त्रींनी पाठराखण केली आहे. भारतीयच नाही तर इंग्लंडच्या ओपनरनाही या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या आणि ड्युक्स बॉल सुरुवातीला खेळणं हे कठीण आव्हान असल्याचं वक्तव्य शास्त्री यांनी केलं आहे.