नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नवीन विक्रमाची नोंद करेल, अशी आशा दर्शवली जात आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या आधी ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतीय संघाने या मालिकेवर विजय मिळवला, तर भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकल्याचा किताब भारतीय संघाच्या नावावर होईल. भारतीय कसोटी सामन्यात सलामीवीरांच्या बाबतीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय कसोटी सामन्यातील सलामीवीर के. एल. राहुल आणि मुरली विजय यांच्या खेळीने संघाला निराश केले. यामुळे भारतीय संघाकडून सलामीला खेळण्याची जबाबदारी मयांक आगरवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडे देण्यात आली. मयांक आगरवाल आणि विहारी यांची खेळी पाहून प्रथम श्रेणीतील आणखी ५ खेळाडूंच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो.
सिद्धेश लाड हे नाव जास्त चर्चेत नाही. लाड याची खेळी पाहून आशा केली जाते की, हा खेळाडू चांगली कामगिरी करु शकतो. २६ वर्षांचा सिद्धेश लाड हा मुंबई संघामध्ये उत्तम खेळी खेळणारा फलंदाज आहे. रणजी ट्रॉफीत लाड याने ७ सामन्यांत ६५२ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक ४ अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या रणजी ट्रॉफीत लाड याने ५९.२७च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गेल्या वर्षात विजय हजारे ट्रॉफित त्याने ६२.१७ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४८ सामन्यात ४३.६९ च्या सरासरीने ३५८३ धावा केल्या आहेत. यात ८ शतक आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
रिकी भुई हा २२ वर्षीय उत्तर प्रदेशचा निवासी आहे. भुई हा आंध्र प्रदेशाकडून खेळतो. भुई याचे राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच्या यादीत नाव नोंदवण्यात आले आहे. रणजी ट्रॉफीत त्याने ७ सामन्यांत ४ शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीने ७६६ धावा केल्या आहेत. मागच्या रणजी ट्रॉफीत भुई याने ६१ सरासरीने ५५३ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रिकी भुई याने ३३ सामन्यांत ४७.५८ च्या सरासरीने २२८४ धावा केल्या आहेत. यात ८ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.
ईश्वरन हा बंगालकडून खेळणारा उत्तम फलंदाज आहे. दिल्लीविरुद्ध मागच्या सामन्यात विजय मिळवण्यात अभिमन्यू ईश्वरन याने महत्वाची भूमिका साकारली होती. रणजी ट्रॉफित त्याने ८० च्या सरासरीने ६५३ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या समावेश आहे. ईश्वरन यांचे भारतीय संघ 'ब' मध्ये निवड झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट करीअर मध्ये त्याने ४१ सामन्यांत ९ शतके आणि १६ अर्धशतकांच्या जोरावर ४७.१९ च्या सरासरीने ३१६२ धावांचा पल्ला गाठला आहे. गेल्या महिन्यात हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात ईश्वरन याने सर्वोकृष्ट १८३ धावा केल्या.
प्रियांक पंचाळची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे की कधी त्याला भारतीय कसोटी सामन्यात संधी मिळेल ? अहमदाबाद संघाकडून खेळणारा प्रियांक पंचाळ २८ वर्षांचा खेळाडू आहे. रणजी ट्रॉफीत प्रियांक याने ८८७ धावा करुन सर्वाधिक धावा करणाऱ्या २०१८ मधील खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान मिळवले. यामध्ये त्याने ४ शतके तर ५ अर्धशतके ठोकली. प्रथम श्रेणी क्रिकेट करिअरमध्ये प्रियांक याने ७६ सामन्यांत ४७.९१ च्या सरासरीने ५ हजार ४६२ धावा केल्या आहेत. यात १९ शतके तर २० अर्धशतकांचा समावेश आहे. काही दिवसापूर्वीच त्याने महाराष्ट्र विरुद्ध सामन्यात १४१ धावा केल्या आहे.
भारतीय क्रिकेट संघात समावेश होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभम गिलचे नाव आहे. आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप २०१८ मध्ये शुभम गिल सर्वोकृष्ट कामगिरी बजावली होती हे सर्वांच ठाऊक आहे. तसेच आयपीएल २०१८ च्या हंगामात कोलकाताकडून खेळताना गिल याने चांगली कामगिरी बजावली होती. प्रथम श्रेणी क्रिकेट करिअरमध्ये गिल याने ८ सामन्यांत ८२.५० च्या सरासरीने ९९० धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.