दुबई : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय मिळाला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाचे खातं पॉइंट टेबलमध्ये उघडले असून आता ग्रुप-2 मध्ये 2 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
या मोठ्या विजयासह टीम इंडियाचा नेट रन रेटही प्लस झालं आहे. यापूर्वी टीम इंडियाचं रनरेट मायनसमध्ये होतं. टीम इंडियाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून यापैकी एक सामना जिंकला आहे. आता टीम इंडियाचा नेट-रनरेट +0.073 झालं आहे. तर आता प्रश्न असा आहे की तरीही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते का?
नेट-रन रेट प्लसमध्ये आणण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 63 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करावं लागलं होतं. दरम्यान टीम इंडियाने तेच केलं आहे. यासह नेट-रनरेट +0.073 वर पोहोचला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे. मात्र त्यांना त्यांचे आगामी दोन सामनेही मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
मात्र, यामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार नाही. त्यासाठी अफगाणिस्तानलाही न्यूझीलंडला हरवावं लागणार आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवला, तर नामिबियाच्या सामन्यात भारताला सर्व कॅल्कुलेशन करायची वेळ येईल.
टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं तर त्यासाठी मोठ्या धावसंख्येची गरज नाही. म्हणजेच अफगाणिस्तान एका रनने जिंकला तरी त्याचा फायदा टीम इंडियाला होईल. दुसरा मोठा मुद्दा असा आहे की, भारताचे लीग सामने शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे टीम इंडियाला आधीच कळेल की त्यांना किती नेट-रनरेट टार्गेट करायचं आहे.