कोहलीचं चुकलंच! पहिल्या 2 सामन्यात या खेळाडूला बाहेर ठेवणं पडलं महागात

टीम इंडियाने या सामन्यात दोन मोठे बदल केले होते आणि हे बदल अगदी योग्य होते. 

Updated: Nov 4, 2021, 08:18 AM IST
कोहलीचं चुकलंच! पहिल्या 2 सामन्यात या खेळाडूला बाहेर ठेवणं पडलं महागात title=

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्डकपमधील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियाने या सामन्यात दोन मोठे बदल केले होते आणि हे बदल अगदी योग्य होते. 

या खेळाडूने सामना बदलला

दिग्गज स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनने काल उत्तम कामगिरी केली. अश्विनला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीने त्याला संधी दिली नाही, त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये केवळ 14 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अश्विनला संधी दिली असती तर त्याचा निकाल वेगळा लागला असता.

अश्विनच्या जागी विराट कोहली सतत वरुण चक्रवर्तीला संधी देत ​​होता. चक्रवर्तीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असेल, पण वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याला अनुभव नव्हता. मिस्ट्री स्पिनर मानला जाणारा चक्रवर्ती पहिल्या दोन सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही. या गोलंदाजाला पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही आणि न्यूझीलंडविरुद्धही तो विकेट घेऊ शकला नाही. 

अफगाणिस्ताविरूद्ध भारताचा विजय

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 2 विकेट्स गमावत 210 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ 7 गडी गमावून केवळ 144 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यासह आता टीम इंडियाचे 3 सामन्यांत 2 गुण झाले आहेत.

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध या T-20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. 20 ओव्हर्सनंतर भारताची धावसंख्या 2 विकेट्स 210 धावांवर होती. भारताकडून रोहित शर्माने 74, केएल राहुलने 69 रन्स केले. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने नाबाद 35 आणि ऋषभ पंतने नाबाद 27 धावा केल्या.