नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकशे राहुल यांचे निलंबन गुरुवारी मागे घेण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासक समितीने (सीओए) हा निर्णय घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील अमायकस क्युरी (न्यायमित्र) पी.एस. नरसिम्हा यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला. ११ जानेवारीला हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात बीसीसीआयचा अहवाल आणि निर्णय येणे बाकी आहे. मात्र, तुर्तास निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याचे प्रशासक समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
CoA: The matter and decision has been taken with the concurrence of Amicus Curiae, P.S. Narasimha. In view of the above, the suspension orders dated 11.01.2019 is immediately lifted pending appointment and adjudication of the allegations by the BCCI Ombudsman https://t.co/24ydnzzJn7
— ANI (@ANI) January 24, 2019
टेलिव्हिजनवरील 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पांड्या याने महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हार्दिकसह लोकेश राहुल याच्यावरही सडकून टीका करण्यात आली होती. यानंतर प्रशासक समितीने थेट निलंबनाची कारवाई केल्याने या दोघांनाही मोठा धक्का बसला होता. यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतावे लागले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व लोकेश राहुलच्या पुढील कारकीर्दीचा विचार करता त्यांच्यावर इतकी कठोर कारवाई करु नये, असा सूर उमटत होता. दरम्यान, या प्रकारानंतर बीसीसीआयने संपूर्ण संघालाच शिस्तीचे धडे देण्याचा निर्णय घेतला होता. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या एका समुपदेशन सत्रात संपूर्ण भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंना वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहेत.