'या' वेगवान गोलंदाजाला ICC चा मोठा झटका

एका घातक गोलंदाजाला दंड ठोठावण्यात आला आहे.

Updated: Jan 12, 2022, 09:23 AM IST
'या' वेगवान गोलंदाजाला ICC चा मोठा झटका title=

न्यूझीलंड : बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका न्यूझीलंडसाठी खास आहे. कारण न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर निवृत्त होणार आहे. दरम्यान, बांगलादेश विरूद्धच्या कसोटीत न्यूझीलंडच्या एका घातक गोलंदाजाला दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यूझीलंडच्या गोलंदाजाला दंड

क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यासिर अलीला बाद केल्यानंतर चुकीची भाषा वापरल्याबद्दल न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला दंड लावलाय. मंगळवारी त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड त्याला ठोठावण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना एक डाव आणि 117 रन्सने जिंकला.

आयसीसीच्या कलमांनुसार, काइल जेमिसनने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या2.5 चं उल्लंघन केलंय. त्याचप्रमाणे जेमीसनच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला गेलाय. 24 महिन्यांमध्ये ही तिसरी वेळ असल्याने त्याचे एकूण 3 डिमेरिट गुण झाले आहेत.

यापूर्वी, जेमिसनने 23 मार्च 2021 रोजी क्राइस्टचर्चमध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आणि 28 डिसेंबर 2020 रोजी टॉरंगामधील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी बांगलादेशच्या पहिल्या डावातील 41 व्या ओव्हरमध्ये जेमिसनने यासिर अलीला आऊट केलं आणि अयोग्य भाषा वापरली. जेमिसनने सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ठोठावलेला दंड मान्य केला. मैदानावरील अंपायर ख्रिस गॅफनी आणि वेन नाइट्स, थर्ड अंपायर ख्रिस ब्राउन आणि चौथे अंपायर शॉन हेग यांनी आरोप निश्चित केलेत.