Rohit Sharma Reaction: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली. शुक्रवारी या सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. मात्र हा सामना टाय झाला. श्रीलंकेच्या कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. दरम्यान या कामगिरीमुळे टीमला सामना जिंकता आला नाही. या सामन्यांनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा थोडा निराश झाला.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. संपूर्ण सामन्यात आमचं सातत्य दिसून आलं नाही. आम्ही चांगली सुरुवात केली होती. पण आम्हाला माहित होते की, 10 ओव्हरनंतर खरा खेळ सुरू होईल जेव्हा स्पिनर्स येतील. पण नंतर आम्ही काही विकेट्स गमावल्या आणि गेममध्ये पिछाडीवर गेलो.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या पार्टनरशिपमुळे आम्ही पुन्हा एकदा खेळात परतलो. मात्र शेवट थोडा निराशाजनक होता. 14 चेंडूत 1 रन आवश्यक होता. अशा परिस्थितीत अशा गोष्टी घडतात. श्रीलंकेने चांगला खेळ केला. जेव्हा आम्ही गोलंदाजी केली तेव्हा पहिल्या 25 ओव्हर्समध्ये समस्या आल्या आणि त्यांच्यासाठीही तेच होतं होतं. जसजसा खेळ पुढे गेला तसतशी दोन्ही टीमची वेगवान गोलंदाजी बिघडली आणि फलंदाजी थोडी सोपी झाली.
ही अशी जागा नाही जिथे तुम्ही येऊन तुमचे शॉट्स खेळू शकता आणि रन करू शकता. रन करण्यासाठी तुम्हाला खरोखर चांगले प्रयत्न करावे लागतील. आम्ही शेवटपर्यंत ज्या प्रकारे खेळत होतो त्याचा अभिमान आहे. हा सामना वेगवेगळ्या वेळी दोन्ही टीमच्या बाजूने गेला. संयम राखणं आणि खेळात टिकून राहणं महत्त्वाचं होतं, तो एक रन आम्हाला मिळायला हवा होता, असंही रोहितने म्हटलंय.