मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला. त्यानंतर विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वन डे आणि टी 20 पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं आहे. टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण? या चर्चांना उधाण येत असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाच्या कर्णधाराची लवकरच घोषणा होणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोहलीच्या निर्णयाचा आदर करतो, असं ट्विट करत, कोहली भारताचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार असल्याचं गांगुली यांनी सांगितलं आहे.
कसोटी क्रिकेट कर्णधारपदाच्या स्पर्धेत रोहित शर्मा आणि के एल राहुल अशा दोन नावांची चर्चा होती. रोहित शर्माच्या फिटनेसमुळे कदाचित के एल राहुलकडे हे पद सोपवलं जाणार अशी चर्चा होती. या सगळ्या चर्चांना लवकरच पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे लवकरच कर्णधारपदाचं नाव जाहीर करण्यात येणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता असली, तरी याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असंही गांगुलीनं सांगितलं आहे. सौरव गांगुली यांच्या एकूणच बोलण्यातून हे स्पष्ट होत आहे की रोहित शर्माकडे कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद जाण्याची शक्यता अधिक आहे. मात्र अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे.