IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो

Team India qualified in Super 8 : टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 विकेट्सने पराभव करून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाला अमेरिकेत विजयाची हॅट्रिक लगावता आलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jun 13, 2024, 12:04 AM IST
IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो title=
Team India qualified in Super 8

United States vs India : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 गडी राखून पराभव केलाय. युएसएने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 110 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 10 बॉल राखून 111 धावांचं आव्हान पूर्ण केलं. भारताकडून अर्शदीप सिंगने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या तर सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकलंय. टीम इंडियाने युएसएचा पराभव केल्यानंतर आता सुपर 8 मध्ये एन्ट्री केलीये. अमेरिकेच विजयाची हॅट्रिक मारल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या पीचवर खेळणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी 111 धावांचे लक्ष्य ठेवलं  होतं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा अर्शदीप सिंगने करून घेतला. अर्शदीपने आपल्या घातक गोलंदाजीचा वापर केला अन् युएसएला धक्क्यावर धक्के दिले. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या अन् 4 विकेट्स नावावर केल्या. तर हार्दिक पांड्याने महत्त्वाच्या 4 ओव्हरमध्ये केल्या अन् केवळ 14 धावा दिल्या तर 2 गडी बाद केले. 

युएसएने दिलेलं 111 धावांचं आव्हान टीम इंडियासाठी सोपं होतं पण दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. पाकिस्तानविरुद्ध स्टार ठरलेला सौरभ नेत्रावळकर टीम इंडियाविरुद्ध देखील घातक ठरला. त्याने सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्माची विकेट काढली अन् टीम इंडियाला अडचणीत आणलं. त्यानंतर मात्र, ऋषभ पंत आणि सूर्यकुमारने डाव सांभाळला. ऋषभ बाद झाल्यानंतर शिवम दुबेने डाव सांभाळला. दुबेने 31 धावा केल्या तर सूर्याने 49 बॉलमध्ये 50 धावा केल्या. टीम इंडियाने 10 बॉल राखून विजय मिळवलाय.

युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.