अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी? तालिबानींच्या आदेशाने क्रिकेट जगतात खळबळ

अफगाणिस्तानच्या टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेले तालिबानी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

पुजा पवार | Updated: Sep 14, 2024, 07:55 PM IST
अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी? तालिबानींच्या आदेशाने क्रिकेट जगतात खळबळ  title=
(Photo Credit : Social Media)

Afghanistan Cricket : अफगाणिस्तान क्रिकेट टीमने खूप कमी वेळात उत्तम कामगिरीकरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र साऊथ आफ्रिकेकडून पराभव झाल्याने ते फायनल गाठू शकले नाहीत. अफगाणिस्तानच्या टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेले तालिबानी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानींनी यापूर्वी अफगाणिस्तानत महिलांच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घातलेली होती आता काही रिपोर्ट्समधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार तालिबान शासकाने देशात क्रिकेटवर पूर्णपणे बंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. 

अफगाणिस्तानात क्रिकेट बंदीच्या आदेशाबाबत अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ नक्कीच उडवली आहे. अजून हे स्पष्ट नाही की ही बंदी कधी आणि कशी अंमलात आणली जाईल. असा दावाही केला जात आहे की तालिबानमधील लोकांचा असा विश्वास आहे की क्रिकेट खेळामुळे देशात वाईट वातावरण निर्माण होत आहे आणि ते शरियाच्या विरोधात आहे.

हेही वाचा : Video : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार

 

सध्या अफगाणिस्तानात राजकीय वातावरण चांगलं नसल्यामुळे अफगाणिस्तानची टीम सध्या ग्रेटर नोएडामध्ये सराव करत आहे. भारतातील हे स्टेडियम त्यांना होम ग्राउंड म्हणून नेमून देण्यात आले आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सप्टेंबर रोजी भारताच्या ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमवर टेस्ट सामना पार पडणार होता. मात्र हा सामना पाऊस आणि ओल्या आउटफील्डच्या कारणाने एकही बॉल न खेळवता रद्द करण्याची नामुष्की ओढवली. 91 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकही बॉल टाकल्याशिवाय टेस्ट सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान सह अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेटमुळे ओळख मिळवली आहे. हे क्रिकेटर्स जगभरात फ्रेंचायझी क्रिकेट खेळून भरपूर कमाई करतात आणि सोबतच अफगाणिस्तानचे नाव रोशन करतात. अफगाण टीम आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप पुढे गेली आहे. मात्र तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट बंदीचा निर्णय लागू केल्यास काय अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमचं काय होईल याविषयी अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत.