रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'

टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2024, 04:08 PM IST
रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...' title=

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोलाचा वाटा आहे. या विजयानंतर मैदानात झालेल्या जल्लोषात राहुल द्रविडही त्याच उत्साहात सहभागी झाला होता. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा राहुल द्रविडही आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला. दरम्यान भारतीय संघ जेव्हा मुंबईत दाखल झाला तेव्हा राहुल द्रविड बॅकसीटवर उभं राहून भारतीय खेळाडूंना त्यांच्या क्षणांचा आनंद घेण्याची संधी देत फक्त अनुभव घेत होता. 

भारतीय संघाचा एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पराभव झाला तेव्हाच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. त्याची आपला कार्यकाळ वाढवून घेण्याची कोणतीही इच्छाच नव्हती. पण रोहित शर्माने विनंती केल्याने राहुल द्रविडने टी-20 वर्ल्जकपपर्यंत कार्यकाळ वाढवण्यासाठी संमती दर्शवली होती. राहुल द्रविडला आता आपल्या या निर्णयाचं समाधान वाटत असून यासाठी त्याने कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले आहेत. वानखेडे मैदानात बोलताना राहुल द्रविडने आपल्या भावना व्यक्त केल्या.

'माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम फोन कॉल'

राहुल द्रविडला एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रिलेयाकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने केलेल्या फोनबद्दल विचारण्यात आलं. या फोन कॉलमध्ये रोहित शर्माने राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपद न सोडण्याची विनंती केली होती. "रोहितने फोन केला आणि म्हणाला आपण अजून एक प्रयत्न करुयात", अशी माहिती राहुल द्रविडने दिली. "मला वाटतं माझ्या आयुष्यातील तो सर्वोत्कृष्ट फोन कॉल होता," अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या. भारतीय कर्णधाराशी झालेला संवाद आठवताना द्रविडच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. 

द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या विश्वचषक फायनलसह संपला असला तरी, त्याच्यासह कोचिंग स्टाफला टी-20 विश्वचषक संपेपर्यंत मुदतवाढ मिळाली. सात महिन्यांनंतर भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला पुरुष संघ बनला.

'हे खेळाडू माझ्या कुटुंबाप्रमाणे'

"कारकीर्द संपवण्यासाठी हा विलक्षण क्षण आहे. मी या सर्व प्रेमाला मुकणार आहे. आज आपण जे पाहत आहोत आणि विजयानंतर जे ऐकत आहे ते पाहता भारत क्रिकेटला मोठं करत आहे. ही मुलं कुटुंबासारखी आहेत. या मुलांनी जेवढी मेहनत केली आहे ते अविश्वसनीय आहे आणि ते सतत चांगले होण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ म्हणून आम्ही आणखी काही मागू शकत नव्हतो. या संघाचे प्रशिक्षकपद भूषवता आले याचा आम्हाला अभिमान आहे", असं द्रविडने नमूद केलं.