अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप

T20 world cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पराभवामुळे पाकिस्तानला आधीच धक्का बसला असताना आता त्यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे.

राजीव कासले | Updated: Jun 7, 2024, 06:34 PM IST
अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप title=

T20 world cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये गुरुवारील सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव (USA Defeat Pakistan) करत इतिहास रचला. पराभवामुळे पाकिस्तानला आधीच धक्का बसला असताना आता त्यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफवर (Haris Rauf) सामन्यादरम्यान बॉल टॅम्परिंगचा (Ball Tampering) आरोप करण्यात आला आहे. अमेरिका क्रिकेट संघाचा खेळाडू रस्टी थेरॉनने हा आरोप केलाय. रस्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सपर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने आयीसीकडे प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. 

सामन्यात नेमकं काय घडलं?
हारिस रौफने रिव्हर्स सिंग करण्यासाठी बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप रस्टी थेरॉनने केलाय. दोन षटकाआधी बदलण्यात आलेल्या चेंडूला हारिस रौफ नखाने कुरतडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं, असं थेरॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रकाराने पाकिस्तानने सामन्यात बेईमानी केल्याची चर्चा रंगली आहे. 

अमेरिकेचा सुपर विजय
टी20 वर्ल्ड कपमध्ये 6 जूनला यजमान अमेरिका आणि पाकिस्तान आमने सामने होते. या सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत 7 विकेटच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या अमेरिकेने निर्धारित 20 षटकात 3 विकेट गमावत 159 धावा करत सामना टाय केला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पहिली फलंदाजी करत एका षटकात 19 धावा केल्या. पाकिस्तानाच वेगवान गोलंदाज मोहम्मद आमरिने तीन वाईड बॉल टाकत टाकले. 

19 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला 1 विकेट गमावत 13 धावा करता आल्या. 

पॉईंटटेबलमध्ये उलटफेर
अमेरिकेच्या पाकिस्तानवरच्या विजयामुळे पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये अमेरिका अव्वल स्थानावर पोहोचली आहे. अमेरिकेने दोन विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात चार गुण जमा झालेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत असून भारताच्या खात्यात दोन गुण जमा आहेत. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. पाकिस्तान तिसऱ्या, कॅनडा चौथ्या आणि आयर्लंड पाचव्या क्रमांकावर आहे. येत्या 9 तारखेला भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानाचं भवितव्य ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तानवर लीगमध्येच बाहेर जाण्याची नामुष्की ओढावेल.