T20 World Cup 2022 Ireland Won Against England: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पावसानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर एकाच वेळी पाणी फेरल्याचं चित्र आहे. पहिल्या गटात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आघाडीवर आहेत. त्यामुळे इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या दोनमध्ये येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेत पावसाची भूमिका देखील महत्त्वाची ठरत आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडनं 19.2 षटकात सर्वबाद 157 धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंड फलंदाजीला आल्यावर पावसानं हजेरी लावली आणि संपूर्ण गणित विस्कटून गेलं. इंग्लंडनं 14.3 षटकात 5 गडी गमवून 105 धावा केल्या. मात्र डकवर्थ लूईस नियमानुसार आयर्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या विजयामुळे सुपर 12 फेरीतील पहिल्या गटातील गणित बिघडलं आहे.
इंग्लंडच्या संघाने 14.3 षटकात 5 गडी गमावून 105 धावा केल्या होत्या. तेव्हाच पावसाने हजेरी लावली. डकवर्थ-लुई स्टर्न (DLS) नियमानुसार इंग्लंड तेव्हा 5 धावांनी मागे होते. डकवर्थ-लुई स्टर्न नियमानुसार आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया या संघाचे प्रत्येकी 2 गुण झाले आहेत. तर अफगाणिस्तानचा संघ शून्य गुणासह तळाशी आहे. या गुणतालिकेत न्यूझीलंड आणि श्रीलंकेची धावगती चांगली आहे. त्यानंतर इंग्लंड आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो. पण ऑस्ट्रेलिया-1.555 धावगतीसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुढील सामने चांगल्या धावगतीसह जिंकावे लागतील.
संघ | सामने | विजय | पराभव | धावगती | गुण |
न्यूझीलंड | 1 | 1 | 0 | +4.450 | 2 |
श्रीलंका | 2 | 1 | 1 | +0.450 | 2 |
इंग्लंड | 2 | 1 | 1 | +0.239 | 2 |
आयर्लंड | 2 | 1 | 1 | -1.169 | 2 |
ऑस्ट्रेलिया | 2 | 1 | 1 | -1.555 | 2 |
अफगाणिस्तान | 1 | 0 | 1 | -0.620 | 0 |
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, फियोना हँड, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.