भारतीय क्रिकेटपटूला WhatsApp मेसेज पाठवून 28 वर्षीय मॉडेलने स्वत:ला संपवलं; पोलीस म्हणाले, 'कॉल...'

Surat Model Suicide Case IPL Connection: या 28 वर्षीय मॉडेलने आत्महत्या करण्यापूर्वी आयपीएल क्रिकेटपटूला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. पोलिसांना मोबाईल डेटामध्ये ही माहिती सापडली असून आता याच आधारे चौकशी होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2024, 12:53 PM IST
भारतीय क्रिकेटपटूला WhatsApp मेसेज पाठवून 28 वर्षीय मॉडेलने स्वत:ला संपवलं; पोलीस म्हणाले, 'कॉल...' title=
तो नुकताच रणजी चषक खेळला

Surat Model Suicide Case IPL Connection: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलचं यंदाचं पर्व मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यापूर्वीच आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील एका खेळाडूला आत्महत्या प्रकरणात पोलीस चौकशी होणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला गुजरातमधील सुरत पोलिसांनी 28 वर्षीय मॉडेलच्या आत्महत्याप्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावलं आहे. 

कोण आहे ही मॉडेल?

सुरतमधील वासू रोडवरील हॅपी एलिगन्स अपार्टमेंट येथे राहणारी 28 वर्षीय मॉडेल तानिया सिंहने 20 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तानियाचा मृतदेह तिच्या या घरात छताला लटकलेल्या आवस्थेत आढळून आला. या प्रकरणामध्ये क्रिकेटपटू अभिषेक शर्माचं नाव आधीपासूनच चर्चेत आहे. मागील 2 वर्षांपासून तानिया ही मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. ती मॉडेल म्हणून काम करायची मात्र त्याचवेळी ती एक उत्तम फॅशन डिझायनरही होती. पोलिसांनाही या प्रकरणामध्ये तातडीने तपास सुरु केला. तानियाच्या फोन रेकॉर्ड्सवरुन पोलिसांना तपासाचे धागेदोरे सापडले. आत्महत्या करण्यापूर्वी तानियाने तिच्या मोबाईलवरुन शेवटचा व्हॉट्अप मेसेज क्रिकेटपटू अभिषेक शर्माला पाठवला होता. 19 फेब्रुवारीपर्यंत अभिषेक शर्मा पंजाबच्या संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत होता. अभिषेकने तानियाच्या या मेसेजला रिप्लाय केलेले नव्हता.

कॉल डिटेल्समध्येही सापडला क्रिकेटपटूचा क्रमांक

सुरत पोलिसांचे सहायक पोलीस आयुक्त व्ही. आर. मल्होत्रा यांनी 'आजतक'ला दिलेल्या माहितीनुसार, तानिया सिंहचा सीडी-आर रिपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तानिया ही मूळची हैदराबादची आहे. पोलीस या प्रकरणामध्ये अभिषेकला नोटीस पाठवणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये अभिषेकची चौकशी केली जाणार आहे. तानियाच्या फोनमधील कॉल डिटेल्समध्येही अभिषेकचा नंबर पोलिसांना सापडला आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. हाच संदर्भ पोलीस अभिषेकला नोटीस पाठवताना देणार असल्याचं समजतं. अभिषेक आणि तानिया एकमेकांचे मित्र होते असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

राष्ट्रीय स्तरावर दखल

आयपीएलमधील एका नवोदित क्रिकेटपटूचा या आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याने या तपासासंदर्भातील बातम्यांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. अभिषेक शर्मा हा 2018 पासून आयपीएल खेळत आहे. 2018 मध्ये तो दिल्लीकडून खेळला. त्यानंतर 2019 पासून तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळतोय. सनरायझर्स हैदराबादच्या टीमची मालकी उद्योजिका काव्या मारण यांच्याकडे आहे.

400 धावा ठोकल्या...

अभिषेक शर्मा हा सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी सातत्यपूर्ण खेळी करणारा खेळाडू आहे. मागील 2 पर्वात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. 2022 च्या पर्वामध्ये त्याने 400 दावा केल्या आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या पर्वात त्याला आधीच्या पर्वासारखी चांगली कामगिरी करता आली नाही. 2023 च्या पर्वात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेकला केवळ 250 धावा करता आल्या.