'भारत हे खरं नाव आहे, पण...', India नाव बदलण्यावरुन गावसकर स्पष्टच बोलले; 'तरच भारत संघ म्हणायचं'

'इंडिया'ऐवजी 'भारत' हा शब्दप्रयोग करण्यासाठी केंद्र सरकार आता संविधानात दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनात यासंबंधी प्रस्ताव आणला जाऊ शकतो. त्यातच आता सुनील गावसकर यांनी यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 6, 2023, 01:35 PM IST
'भारत हे खरं नाव आहे, पण...', India नाव बदलण्यावरुन गावसकर स्पष्टच बोलले; 'तरच भारत संघ म्हणायचं' title=

आगामी काळात सर्व ठिकाणी 'इंडिया'ऐवजी 'भारत' हा शब्दप्रयोग केला जावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार आता संविधानात दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनात यासंबंधी प्रस्ताव आणला जाऊ शकतो. यानंतर देशभरात इंडिया विरुद्ध भारत अशी चर्चा रंगली आहे. मंगळवारी या विषयावर चर्चा सुरु असतानाच माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने ट्वीट करत पाठिंबा दर्शवला होता. आता त्यातच लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. जो काही निर्णय घेतला जाईल, तो अधिकृतपणे घेतला जावा असं त्यांनी सुचवलं आहे. 

इंडिया टुडेशी संवाद साधताना सुनील गावसकर यांनी मान्य केलं की, "देशाचं खरं नाव भारतच आहे. पण जर बदल करायचा असेल तर मग तो सर्व ठिकाणी करावा लागेल".

"भारत हेच खरं नाव आहे. त्यामुळे त्याला एक चांगली पार्श्वभूमी आहे. पण नावात बदल करताना अधिकृत, सरकारी आणि बीसीसीआय पातळीवरही बदल करावा लागणार आहे. जेणेकरुन संघाला भारत क्रिकेट टीम असं म्हणता येईल. पण बदल याआधीही झाले आहेत. बर्माला आता म्यानमार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे खरं नाव देण्यात काही हरकत नाही. त्यात काही समस्या असल्याचं मला तरी दिसत नाही. फक्त हा बदल सगळीकडे केला पाहिजे," असं सुनील गावसकर म्हणाले आहेत. 

याआधी विरेंद्र सेहवागने बीसीसीआय सचिव जय शाह यांना आता भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर इंडियाऐवजी भारत लिहिलं जावं असं सुचवलं होतं. सेहवागने ट्विटरला पोस्ट करताना लिहिलं होतं की, "मला नेहमीच वाटलं आहे की, नाव असं असलं पाहिजे जे तुमच्या मनात अभिमान निर्माण करेल. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव आपल्याला इंग्रजांनी दिलं आहे. आता बराच काळ लोटला असून, भारत हे खरं नाव पुन्हा नाव मिळवण्याची वेळ आली आहे. मी जय शाह यांना विनंती करतो की, या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडूच्या जर्सीवर भारत लिहिलेलं असावी याची खात्री करा".

एकेकाळचा धडाकेबाज सलामीवीर राहिलेल्या सेहवागने यावेळी पाठिंबा दर्शवताना विविध नावांनी विश्वचषक खेळणाऱ्या इतर देशांची उदाहरणंही दिली. त्याने आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये नेदरलँडचं उदाहरण दिलं.

"1996 च्या विश्वचषकात, नेदरलँड्स हॉलंड नावाने भारतात विश्वचषक खेळायला आले होते. 2003 मध्ये जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा ते नेदरलँड्स होते आणि आताबही आहेत. ब्रिटीशांनी दिलेलं नाव बर्माने बदलून म्यानमार ठेवलं आहे. इतरही अनेकजण त्यांच्या मूळ नावावर परतले आहेत," असं सेहवागने सांगितलं आहे.