'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान

Sunil Gavaskar On BCCI Secretary Jay Shah: सुनील गावसकर हे त्यांच्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. आता त्यांनी बीसीसीआयचे सचीव असलेल्या जय शाहांबद्दल व्यक्त केलेलं मत चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 9, 2024, 01:06 PM IST
'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान title=
एका मुलाखतीत बोलताना गवसकरांनी केलं विधान

Sunil Gavaskar On BCCI Secretary Jay Shah: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडाचे सचीव असलेल्या जय शाहा यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे. राजकीय अजेंड्यामुळे अनेकजण जय शाह यांना त्यांच्या हक्काचं श्रेय देत नसल्याचा टोला लगावत गावसकर यांनी जय शाहांची बाजू घेतली आहे. भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी जय शाहांनी बरेच चांगले निर्णय घेतल्याचं सांगत गावसकर यांनी बीसीसीआयच्या सचीवांची पाठ थोपटली आहे. भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी जय शाह यांनी महिला आणि पुरुषांना समान मानधन देण्यापासून ते अगदी महिला प्रिमिअर क्रिकेट लीग सुरु करण्यापर्यंत अनेक निर्णय घेतल्याचं गावसकर म्हणाले.

गुजरात क्रिकेट असोसिएशनपासून जय शाहांनी केली करिअरला सुरुवात

जय शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसीएशनमध्ये प्रभारी म्हणून काम करत क्रिकेट क्षेत्रातील आपली कारकिर्द सुरु केली. त्यानंतर ते 2015 मध्ये बीसीसीआयशी संलग्न होऊन काम करु लागले. पुढे 2019 मध्ये ते बीसीसीआयचे सचिव झाले. याच जय शाहांबद्दल बोलताना भारताचे सर्वकालीन दिग्गज क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज असलेल्या सुनील गावस्कर यांनी स्तुतीसुमनं उधळली आहे. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र असल्याने जय शाह यांना लक्ष्य केलं जात असल्याचं गावसकर यांनी म्हटलं आहे. सध्याच्या बीसीसीआयच्या नेतृत्वाने लक्ष्यवेधी काम केलं असल्याचं मत गावसकरांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली

लक्ष्यवेधी काम केल्याबद्दल कौतुक

"हे पाहा मला असं वाटतं की बीसीसीआयचं प्रशाकीय काम हे कायमच अशा दर्जाचं राहिलं आहे की त्यामधून त्यांनी भारतीय क्रिकेटला प्रोत्साहनच दिलं आहे," असं गावसकर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हटलं. "प्रत्येक वेळी अशी एखादी व्यक्ती असते जी निराश होते. मात्र सध्याच्या नेतृत्वाने केलेलं काम हे नक्कीच लक्ष्यवेधी आणि वाखाणण्याजोगं आहे," असं गावसकर म्हणाले.

नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'

अनेकजण जय शाहांवर टीका करतात पण...

"अनेकजण जय शाहांवर टीका करतात. मात्र ही टीका करताना त्यांच्या योगदानापेक्षा त्यांच्या वडिलांच्या राजकीय भूमिकेचा संदर्भ अधिक जोडला जातो. मात्र जय शाह यांनी जे काही काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. यामध्ये महिला प्रिमिअर लीग सुरु करणे, महिला आणि पुरुषांना समान मानधन मिळावे यासंदर्भातील निर्णय, आयपीएलमधील मानधन वाढवण्याचा निर्णय कौतुक करण्यासारखेच आहेत. मात्र काहीजण राजकीय अजेंड्यामुळे याचं श्रेय त्यांना देऊ इच्छित नाहीत," असं गावसकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

नक्की पाहा >> ₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...

काही दिवसांपूर्वीच किर्ती आझाद यांनी साधलेला निशाणा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किर्ती आझाद यांनी टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारसंभामध्ये जय शाह हे चषक जिंकणाऱ्या खेळाडूंबरोबर पहिल्या रांगेत बसल्याच्या मुद्द्यावरुन शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. जगात कुठेच अशाप्रकारे विजेत्या संघाचा सत्कार केला जाताना खेळासंदर्भातील पदाधिकाऱ्यांना खेळाडूंबरोबर पहिल्या रांगेत बसू दिलं जात नाही, असं किर्ती आझाद म्हणाले होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x