Big Bash League : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith Hundread) वादळी खेळी करत झंझावती शतक ठोकलं आहे. कसोटी आणि वनडेमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या स्मिथने टी-20 क्रिकेटमध्येही आपण बॉस असल्याचं दाखवून दिलं आहे. स्टीव्ह स्मिथने बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना अॅडलेड स्ट्राईकर्सविरोधात दमदार शतक केलं आहे. (Steve Smiths stormy innings in BBL before India tour scored a century in 56 balls latest cricket news)
संयमाने फलंदाजी करणाऱ्या स्मिथने आपला रूद्रावतार धारण करत शतकी खेळीमध्ये 5 चौकार आणि 7 षटकार मारले. बीबीएलच्या यंदाच्या मोसमात शतक ठोकणार स्मिथ तिसरा खेळाडू ठरला आहे. त्यासोबतच सिडनी सिक्सर्ससाठी वैयक्तिक सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मिथने त्याच्या नावावर केला आहे. याआधी जेम्स विन्सच्या नावावर हा रेकॉर्ड होता त्याने नाबाद 91 धावांची खेळी केली होती.
प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथ आणि जोश फिलिप सलामीला आले. मात्र अवघ्या 1 धावेवर असताना फिलिप बोल्ड आऊट झाला. मात्र त्यानंतर स्मिथने मॅचची सूत्र आपल्या हाती घेत कर्टिस पॅटरसनसोबत 149 धावांची शानदार भागीदारी केली. स्मिथ शतक केल्यावर रनआऊट झाला होता, तो बाद झाल्यावर जॉर्डन सिल्कने अवघ्या 16 चेंडूत 33 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. निर्धारित 20 ओव्हरमध्ये 203-5 धावा केल्या.
दरम्यान, सिडनी सिक्सर्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अॅडलेड स्ट्राईकर्सचा डाव सर्वबाद 144 धावांवर आटोपला. स्मिथसाठी हे शतक संजीवनी ठरू शकतं. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय संघापासून दूर असलेल्या स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.