'तुम्ही मोहम्मद सिराजलाच काय ते विचारा...', श्रद्धा कपूरच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण

भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचे 6 गडी बाद करत अत्यंत सहजपणे भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान मोहम्मद सिराजच्या ऐतिहासिक खेळीनंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 18, 2023, 01:07 PM IST
'तुम्ही मोहम्मद सिराजलाच काय ते विचारा...', श्रद्धा कपूरच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण title=

आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा हा निर्णय फारच चुकीचा ठरला आणि संपूर्ण संघ फक्त 50 धावांमध्ये तंबूत परतला. श्रीलंकेने दिलेलं हे लक्ष्य भारताने फक्त 6.1 ओव्हरमध्येच गाठलं. भारताचा एकही विकेट यादरम्यान पडला नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा मोहम्मद सिराजचा होता. मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेताना अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. आशिया कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा सिराज दुसरा गोलंदाज ठरला. दरम्यान, भारताने सामना जिंकल्यानंतर संपूर्ण जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर सगळेच भारावले होते. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नव्हते. श्रीलंकेविरोधात केलेल्या त्याच्या जबरदस्त कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केल्या होत्या. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर करत मोहम्मद सिराजचं कौतुक केलं. 'क्या बात है, मियाँ मॅजिक,' असं अनुष्काने त्याच्या फोटोसह लिहिलं होतं. 

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही इंस्टाग्रामला एका पोस्ट शेअर केली असून, उपहासात्मक कॅप्शन दिली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वत:चा फोटो शेअर केला असून लिहिलं आहे की, 'या मोकळ्या वेळेत काय करायचं, हे आता सिराजलाच विचारा'.

थोडक्यात श्रद्धाला सामना इतका लवकर संपला आहे की, तो पाहण्यासाठी ठाण मांडून बसलेल्यांनी आता काय करायचं अशी विचारणा केली आहे. पण या पोस्टमुळे ट्विटरला श्रद्धा कपूर ट्रेंडिंग होत आहे. अनेकजण या पोस्टचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. 

मोहम्मद सिराजने सामनाच नाही मनंही जिंकली

सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एका कृतीने तिथे उपस्थित सर्वांची मनंही जिंकली. मोहम्मद सिराजने 'प्लेअर ऑफ द फायनल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरम्यान यावेळी मिळालेली रक्कम त्याने आर प्रेमदास स्टेडिअमच्या ग्राऊंड स्टाफला देत असल्याचं जाहीर केलं आहे. आशिया कप स्पर्धेत सतत पावसाचा व्यत्यय येत असताना त्यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक म्हणून आपण हे पैसे त्यांना देत असल्याचं त्याने म्हटलं. 

श्रीलंकेत पार पडलेल्या आशिया चषकात पावसामुळे अनेक सामन्यांवर परिणाम झाला. भारताचा पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धचा सामना; श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील निर्णायक सामना यामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. "हे रोख बक्षीस मैदानावरील ग्राऊंड स्टाफला जाते. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा शक्यच नव्हती," असे सिराजने सामन्यानंतर सांगितलं.

श्रीलंकेविरोधात 6 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद सिराज एका षटकात चार विकेट घेणारा एकदिवसीय इतिहासातील केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासच्या वन-डेमध्ये सर्वात जलद पाच बळी घेण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 2008 मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 13 चेंडूत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यानंतर 6 बळी घेणारा सिराज हा आशिया चषकातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.