आईचे स्वप्न पूर्ण करत जिंकले सुवर्ण पदक, पण घरी पोहोचताच मिळाली मृत्यूची बातमी आणि...

 त्याच्या आईने काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता आणि आता ती त्याच्यापासून लांब निघून गेली आहे.

Updated: Sep 23, 2021, 12:52 PM IST
आईचे स्वप्न पूर्ण करत जिंकले सुवर्ण पदक, पण घरी पोहोचताच मिळाली मृत्यूची बातमी आणि... title=

हरियाणा : बॉक्सर आकाश कुमार जेव्हा राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी कर्नाटकला जात होता, तेव्हा त्याने त्याच्या आईला सुवर्णपदक आणण्याचे वचन दिले होते. आठवडाभर चाललेल्या या अजिंक्यपद स्पर्धेत आकाशने अनेक मोठ्या दिग्गजांना पराभूत करून सुवर्णपदक जिंकले आणि पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही आपले स्थान पक्के केले होते. यासगळ्या परिस्थितीत आकाशने आपल्या आईचे स्वप्न तर पूर्ण केले परंतु तो त्याचा आनंद आपल्या आईसोबत साजरा करु शकला नाही.

आकाश बेल्लारीहून लांबच्या प्रवासानंतर भिवानी येथील आपल्या गावी पोहोचला, तेव्हा त्याला कळले की, त्याच्या आईने काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता आणि आता ती त्याच्यापासून लांब निघून गेली आहे.

आकाशने त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण करावे त्यासाठी त्याला काहीही अडथळा येऊ नये म्हणून त्याला त्याच्या आईच्या जाण्याची बातमी न सांगण्याच्या निर्णय आकाशच्या कुटुंबाने घेतला. जेव्हा आकाश चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत होता, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि कुटुंबीयांनी विशेष काळजी घेतली की आकाशला त्याच्या आईच्या मृत्यूबद्दल काहीही कळू नये.

आकाशला हा धक्का सहन करणे खूप कठीण होत आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले, "काल मी प्रत्येकाला माझे पदक दाखवत होतो. पदक पाहून आईला देखील खूप आनंद होईल असा विचार मी करत होतो. जेव्हा मी आईशी शेवटचे बोललो तेव्हा मी तिला वचन दिले होते की, मी सुवर्ण जिंकल्यानंतर येईन आणि जेव्हा मी पदक घेऊन इथे घरी पोहोचलो तेव्हा सर्व नातेवाईक तिथे उपस्थित होते. कोणी काही बोलले नाही, त्यांनी मला फक्त आईचा फोटो दाखवला."

आकाशच्या आईच्या मृत्यूनंतर त्याचे काका भवरसिंह यांनी त्यांचे प्रशिक्षक नरेंद्र राणा यांना फोन करून याबद्दल कळवले. त्याचवेळी त्यांनी प्रशिक्षकांना सांगितले की, आकाशला याविषयी काहीही सांगू नका. त्यांना माहित होते की, जर असे झाले तर आकाश सर्व काही सोडून परत येईल आणि आपल्या आईची शेवटची इच्छा तो पूर्ण करु शकणार नाही.

त्यानंतर प्रशिक्षकानी आकाशसोबत संपूर्ण टीमचा फोन काढून घेतला, जेणेकरून आकाशला सोशल मीडिया आणि फोनवरून याबाबत माहिती मिळू नये.

आकाशला विश्वास आहे की, त्याला चॅम्पियन बनवण्यात त्याच्या आईचा मोठा हात आहे. आकाशचा मोठा भाऊही बॉक्सिंग करायचा. तथापि, त्याला एका खूनाच्या प्रकरणात आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. अशा स्थितीत आकाशवर फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप दबाव होता. परंतु तरीही त्याने त्यातून मार्ग काढत आपल्या आईसाठी सुवर्ण पदक जिंकून आला परंतु ते पाहण्यासाठी त्याची आईच या जगात नव्हती, ज्य़ामुळे आकाशच्या आनंदावर विरझन पडलं.