हे असणार सानिया-शोएबच्या बाळाचं नाव

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

Updated: Oct 30, 2018, 05:30 PM IST
हे असणार सानिया-शोएबच्या बाळाचं नाव title=

हैदराबाद : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सानियानं ३० ऑक्टोबरच्या सकाळी मुलाला जन्म दिला आहे. सानिया आणि शोएबनं त्यांच्या मुलाचं नाव इजान मिर्झा मलिक ठेवलं आहे. इजानचा अरबी भाषेतील अर्थ देवाची भेट असा होतो. रेनबो रुग्णालयामध्ये मंगळवारी सानिया मिर्झानं मुलाला जन्म दिला. शोएब मलिकनं ट्विटरवरून याची घोषणा केली.

आम्हाला मुलगा झाला हे सांगताना आनंद होत आहे. पत्नीची तब्येत चांगली आहे. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.. असं ट्विट शोएब मलिकनं केलं आहे. १२ एप्रिल २०१० साली शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचं लग्न झालं होतं.

गरोदर असल्यापासूनच सानिया मिर्झा आणि शोएब मलिकला त्यांच्या बाळाचं नागरिकत्व कोणत्या देशाचं असणार असे सवाल विचारले जात होते. तेव्हा शोएबनं हे बाळ 'ना पाकिस्तानी असेल, ना भारतीय' असं उत्तर दिलं.

पाकिस्तानी टीम सध्या दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मॅच खेळत आहे. परंतु, शोएब मात्र क्रिकेट बोर्डाकडून परवानगी घेत हैदराबादमध्ये पत्नी आणि मुलाची भेट घेण्यासाठी दाखल झालाय.

या बाळानं भारतात जन्म घेतलाय. त्याची आई सानिया अजूनही भारतीय आहे. त्यामुळे नवजात बालकाला आपोआपच भारतीय नागरिकत्वाचा अधिकार मिळतो.

पाकिस्तानी वर्तमानपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'नं दिलेल्या माहितीनुसार, सानिया - शोएबचा मुलगा दुसऱ्याच एखाद्या देशाचं नागरिकत्व ग्रहण करू शकतो... हे खुद्द शोएबनंच म्हटल्याचं द एक्सप्रेस ट्रिब्युननं म्हटलंय.

भारतीय नागरिक असलेल्या सानियाचा पती शोएब पाकिस्तानी क्रिकेटर आहे. या दोघांनी एकमेकांशी आठ वर्षांपूर्वी विवाह केला होता. लग्नानंतर या दोघांनी दुबईतच घर विकत घेत आपला संसार थाटलाय.

सानिया-शोएबचं बाळ मात्र आडनाव दोघांचंही लावणार आहे. सानियानंच काही दिवसांपूर्वी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. बाळाचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असं तिनं म्हटलं होतं.