'जर सचिन तेंडुलकर सध्याच्या ICC नियमांत खेळला असता तर...'; सनथ जयसुर्याचं मोठं विधान

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर सध्याच्या आयसीसी नियमांत खेळला असता तर त्याने दुप्पट धावा आणि शतकं केली असती असं तो म्हणाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 15, 2023, 11:46 AM IST
'जर सचिन तेंडुलकर सध्याच्या ICC नियमांत खेळला असता तर...'; सनथ जयसुर्याचं मोठं विधान title=

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एकेकाळचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयसूर्याने एक्सवर पोस्ट शेअर करत हे मत मांडलं आहे. जर सचिन तेंडुलकर सध्याच्या आयसीसी नियमांत खेळला असता तर त्याने दुप्पट धावा आणि शतकं केली असती असंही तो म्हणाला आहे. 

सनथ जयसूर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूंचा वापर करण्याच्या नियमाचा उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2011 मध्ये हा नियम लागू केला ज्यामध्ये दोन नवे चेंडू देण्यात येतात. एक चेंडू फक्त 25 षटकांसाठी वापरला जात असल्याने चेंडूचा आकार राखण्यात यामुळे मदत झाली. चेंडूचा कडकपणा टिकून राहिल्याने, फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला आणि एकदिवसीय सामन्यातील सरासरी धावसंख्येमध्ये वाढ दिसू लागली.

पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाने गोलंदाजांचा खेळावर चांगला प्रभाव पडावा यासाठी आयसीसी आपल्या नियमात काही बदल करू शकते असं म्हटलं आहे. "एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांसाठी फारच मैत्रीपूर्ण आहे. आयसीसीसाठी एक सल्ला आहे. दोन चेंडूंनी सामन्याची सुरुवात करा. पहिला चेंडू 30 ओव्हरनंतर काढून घ्या. शेवटी चेंडू 35 ओव्हर्स जुना असेल. यामुळे शेवटी चेंडू रिव्हर्स होताना दिसेल. ही कला वाचवा #ReverseSwing," असं वकार युनिसने म्हटलं आहे.

या पोस्टवर व्यक्त होताना सनथ जयसुर्याने आपण वकार युनिसच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तसंच जर सचिन आज खेळत असता तर अधिक धावा आणि शतकं ठोकली असती असं सांगितलं आहे. 

"मी वकार युनिसच्या मताशी सहमत आहे, काही बदल करावे लागतील. जर सचिन तेंडुलकरला दोन चेंडू आणि सध्याच्या पॉवर प्लेच्या नियमानुसार फलंदाजी करण्याचा बहुमान मिळाला असता तर त्याच्या धावा आणि शतके दुप्पट झाली असती," असं जयसूर्याने म्हटलं आहे. 

वर्ल्डकपमधील अनेक सामन्यांमध्ये संघांनी सर्वोच्च धावसंख्या नोंदवल्याचं दिसत आहे. नवी दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांच्या शतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 428 धावा केल्या. 2023 च्या विश्वचषकाने एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही मोडला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने श्रीलंकेने ठेवलेलं 345 धावांचे लक्ष्य गाठलं होतं.