साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला. याचबरोबर ५ टेस्ट मॅचची सीरिज भारतानं ३-१नं गमावली आहे. चौथ्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं संघर्ष करत अर्धशतकं केली. कोहली आणि रहाणेमध्ये १०० रनची पार्टनरशीपही झाली. पण मोईन अलीनं या दोघांची विकेट घेतल्यामुळे भारताच्या आशा मावळल्या. मोईन अलीनं पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल मोईन अलीलाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मोईन अली इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार असला तरी ऑल राऊंडर सॅम कुरनमुळेच भारताला सीरिज गमावण्याची वेळ आली असंच म्हणावं लागेल. या मॅचमध्ये जो रुटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण इंग्लंडची अवस्था ८६-६ अशी झाली होती. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या सॅम कुरननं ७८ रनची महत्त्वाची खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्येही सॅम कुरननं आठव्या क्रमांकावरच ४६ रन केले. याचबरोबर सॅम कुरननं दोन्ही इनिंगमध्ये १-१ विकेट घेतली. पहिल्या इनिंगमध्ये तर कुरननं विराट कोहलीला ४६ रनवर आऊट केलं.
याआधी पहिल्या टेस्टमध्येही भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला होता. त्या मॅचमध्येही सॅम कुरनच भारताच्या विजयामध्ये अडथळा ठरला होता. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कुरननं २४ रन केले होते. तर बॉलिंग करताना भारताच्या ४ विकेट घेतल्या होत्या. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडची अवस्था ८७-७ अशी झाली होती. पण पुन्हा एकदा सॅम कुरननं ६३ रनची खेळी करून इंग्लंडला १८० रनपर्यंत पोहोचवलं.
भारताच्या या दोन्ही पराभवाच्या फरकावर नजर टाकली तर सॅम कुरननं प्रत्येकवेळी आठव्या क्रमांकवर येऊन केलेल्या महत्त्वाच्या खेळी कारणीभूत आहेत, असंच आकडेवारीवरून दिसत आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं सॅम कुरनला टीममधून वगळलं होतं. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०९ रननी विजय झाला होता.