मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी कालचा दिवस काहीसा खडतर गेला.
खासदार सचिन तेंडुलकरला काल संसदेत बोलायचं होतं, पण राज्यसभेतील गोंधळामुळे तो बोलू शकला नाही. सचिन पहिल्यांदाच संसदेत नेमकं काय बोलणार होता, याविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता होती.
सचिनने देखील सोशल मीडियावर आपला प्रश्न मांडला, यासाठी सचिनने फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे.
कारण, राज्यसभेत खासदार म्हणून 'राइट टू प्ले' या विषयावर बोलण्यासाठी उभा राहिला. मात्र सचिनला डीएमके खासदारांच्या गोंधळामुळे भाषण करण्याची संधी मिळाली नाही. सभापती व्यंकय्या नायडू यांनी वारंवार विनंती करुनही गोंधळ करणारे खासदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. तेव्हा नायडू यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं होतं.
खासदारांच्या गोंधळामुळे आपल्या पहिल्यावहिल्या भाषणाची संधी गमावलेल्या सचिनने, मात्र आपला संयम कायम राखत सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. आपल्या फेसबूक पेजवरुन सचिनने राज्यसभेतलं 'राईट टू प्ले' विषयावरचं भाषण शेअर केलं.
यावेळी सचिनने आपले वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांची मराठीमधली एक कविताही वाचून दाखवली. खेळ, फिटनेस आणि आरोग्य या गोष्टी भारतीयांसाठी किती महत्वाच्या आहेत, यावर सचिनने आपले विचार मांडले.
मात्र काल टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन आलेल्या निकालाने राज्यसभेत खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सचिनला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली नाही. मात्र आपले विचार फेसबूकवरुन शेअर करत सचिनने देशवासियांची मन जिंकली आहेत. सचिनच्या या कृतीने काल राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना चांगलीच चपराक बसली असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहे.
आतापर्यंत सचिन तेंडुलकर राज्यसभेत आपल्या अनुपस्थितीवरुन कायम चर्चेत होता. अनेक खासदारांनी सचिनच्या सतत अनुपस्थित राहण्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती.