इंग्लंडच्या जेम्स एँडरसनचा विक्रम, या भारतीयाला मागे टाकलं

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेस्म एँडरसनने विक्रमाला गवसणी घातली आहे. 

Updated: Jan 6, 2020, 12:50 PM IST
इंग्लंडच्या जेम्स एँडरसनचा विक्रम, या भारतीयाला मागे टाकलं title=

केप टाऊन : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेस्म एँडरसनने विक्रमाला गवसणी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये एँडरसनने ५ विकेट घेतल्या. जेम्स एँडरसनचं टेस्ट क्रिकेटमध्ये २८व्यांदा एका इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर एँडरसनने इयन बॉथम आणि आर. अश्विन यांच्या २७ वेळा ५ विकेट घेण्याच्या विक्रमाला मागे टाकलं आहे.

३७ वर्षांच्या जेम्स एँडरसनने ४० रन देऊन दक्षिण आफ्रिकेच्या ५ बॅट्समनना माघारी धाडलं. एँडरसन आता इनिंगमध्ये सर्वाधिकवेळा ५ विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत ८व्या क्रमांकावर आहे.

एँडरसन इंग्लंडचा सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा बॉलर आहे. याचसोबत तो इंग्लंडकडून सर्वाधिकवेळा ५ विकेट घेणारा बॉलरही बनला आहे. एँडरसनची ही १५१वी टेस्ट आहे. १५० पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळणारा एँडरसन हा एकमेव फास्ट बॉलर आहे. एँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये ५८३ विकेट घेतल्या आहेत.

श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक ६७ वेळा ५ विकेट घेतल्या आहे. शेन वॉर्नने ३७ वेळा, रिचर्ड हेडलीने ३६ वेळा, अनिल कुंबळेने ३५ वेळा, रंगना हेराथने ३४ वेळा आणि ग्लेन मॅक्ग्राने २९ वेळा ५ विकेट घेतल्या.

या मॅचमध्ये इंग्लंडचा डाव २६९ रनवर संपुष्टात आला यानंतर एँडरसनच्या घातक बॉलिंगने दक्षिण आफ्रिकेची टीम ८९ ओव्हरमध्ये २२३ रनवर ऑल आऊट झाली. दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गारने सर्वाधिक ८८ रन केले. याशिवाय रस्सी वॅन डर डुसेनने ६८ रन, क्विंटन डिकॉकने २० रन आणि व्हर्नन फिलंडरने १७ रन केले.