Rohit Sharma vs Rohit Pawar At Karjat Jamkhed : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून याच्या कार्यक्रमाला रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी पवारांनी विचारलेल्या प्रश्नांवर शर्माजीच्या लेकाने शाब्दिक षटकार मारले.
कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माचे आगमन होताच काही हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या युवक आणि युवतींनी रोहित...रोहित...रोहित....रोहितच्या नावाचा जल्लोष केला. रोहित शर्मा यावेळी म्हणाला, 'कसं काय कर्जत जामखेड करांनो! पहिल्यांदा मी रोहित दादांचे खूप आभारी आहे की मला इकडे बोलावलं. माझं मराठी एवढं चांगलं नाही पण मी प्रयत्न करणार. मागच्या दोन तीन महिन्यात जे काही झालं आम्ही भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलो. तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचाय. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडा जीव आलाय. आता इथे जी अकॅडमी सुरु होणार आहे मला १०० टक्के गॅरंटी आहे की, पुढचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, बुमराह इथूनच येतील'.
1. रोहित पवारांनी रोहित शर्माला विचारले की, आमच्या ग्रामीण भागात कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशीनच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसा वाटत आहे? यावर रोहित म्हणाला, 'मला पवित्र वाटतंय. आपण जेव्हा गाडीत येत होतो तेव्हा मला वाटत होते की इथे किती शांतता आहे. या क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने मला इकडे यायला मिळाले. त्यामुळे मला भरपूर आनंद झालाय. मी परत इकडे येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार'.
2. आमदार रोहित पवार म्हणाले, रोहित शर्मा इथे आल्याने महाराष्ट्रात आता कर्जतचे वजन वाढले आहे. पण इथे आमच्या नागरिकांचा आवाज ऐकून तुम्हाला कसे वाटले? यावर रोहित शर्मा म्हणाला, 'स्टेडियम पेक्षा मोठा आवाज आज इथे वाटतोय' .
3. तुम्ही क्रीक किंगडम अकॅडमी आमच्या ग्रामीण भागात सुरु करताय तर याभागातून उद्याचे रोहित शर्मा आपल्या देशाला मिळतील असं वाटतं का? रोहित शर्मा यावर म्हणाला, 'मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मी बघतोय की इकडे सगळ्यांमध्ये क्रिकेटची खुप आवड आहे. मला यात कुठलीही शंका नाही की, इथून पुढचे जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल मोहम्मद सिराज सगळे इकडूनच येणार'.
हेही वाचा : Womens T20 World Cup : आजपासून वर्ल्ड कपला सुरुवात; भारत - पाक सामना कधी, फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
4. पवारांनी म्हंटले, 'रोहित भाऊ आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आम्हाला अजून एक वर्ल्ड कप पाहिजे आणि वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन म्हणून कोणाला बघायचंय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थितांना विचारला. यावेळी उपस्थित युवकांनी रोहित...रोहित...रोहित.. नावाच्या घोषणा दिल्या. यावेळी रोहितने मान डोलावून होकार दिला आणि तरुणांचे आभार मानले.
5. रोहित पवारांनी म्हंटले की राशीनला आपण एक स्टेडियम सुरु करत आहोत. कर्जत जामखेडलाही एक स्टेडियम सुरु करणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला उपस्थित सर्वांच्या वतीने विनंति करतो की पुढचे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही जेव्हा सुरू करू तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथे यावं. यावर रोहितने मी इथे नक्की येणार असे म्हंटले.