Suryakumar Yadav बाबत रोहित शर्माने 10 वर्षापूर्वी केलेलं ट्विट होतंय व्हायरल

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी20 मध्ये सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी केली. यानंतर हे ट्विट व्हायरल होतंय.

Updated: Jul 11, 2022, 05:11 PM IST
Suryakumar Yadav बाबत रोहित शर्माने 10 वर्षापूर्वी केलेलं ट्विट होतंय व्हायरल title=

मुंबई : T20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी एक नवीन आशा म्हणून उदयास आला आहे. सूर्यकुमार यादवने रविवारी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 117 धावांची शानदार खेळी खेळली. टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सूर्याने आपल्या खेळीने भारतीय चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली.

सूर्यकुमार यादवच्या T20 शतकानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माचे 10 वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 डिसेंबर 2011 रोजी रोहितने ट्विटरवर लिहिले होते की, 'चेन्नईतील बीसीसीआय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. काही महान क्रिकेटपटू येत आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादवही भविष्यात चमत्कार करू शकतो. यावरून रोहितला सूर्यकुमार यादवच्या प्रतिभेची चांगलीच ओळख असल्याचे दिसून येते.

सूर्यकुमार यादव भारताकडून टी-20 मध्ये शतक झळकावणारा केवळ 5वा फलंदाज आहे. सूर्यकुमारपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि दीपक हुडा यांना ही कामगिरी करता आली होती. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहित शर्माने 4 आणि केएल राहुलने 2 शतके झळकावली आहेत. सुरेश रैना आणि हुड्डा यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले होते.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सात विकेट गमावत 215 धावा केल्या होत्या. डेव्हिड मलानने 39 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने 29 चेंडूंत चार षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावांचे योगदान दिले. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारतीय संघ नऊ विकेट्सवर केवळ 198 धावा करू शकला आणि त्यांना 17 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 117 आणि श्रेयस अय्यरने 28 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून रीस टॉप्लीने तीन बळी घेतले. ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड विली यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.